परभणी जिल्ह्यात केवळ 36 टक्के पीक कर्जाचे वाटप!

परभणी जिल्ह्यात केवळ 36 टक्के पीक कर्जाचे वाटप!

परभणी (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण राज्य हे कोरोना महामारीशी झूंज देत असून, पुन्हा एकदा राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी पुन्हा निर्बंध घालण्यात येत आहेत. दरम्यान, यावर्षीच्या रबी हंगामात शेतकऱ्यांना पीक कर्जाचा लाभ देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून बँकांना 451 कोटी 87 लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र रबी हंगाम संपला तरीही आतापर्यंत बँकांनी केवळ 35.78 टक्केच पीक कर्जाचे वाटप केले आहे. त्यामुळे पीक कर्ज वाटप करताना बँकांनी आखडता हात घेतल्याचे दिसून येत आहे.

शेतकरी मागील दोन-तीन वर्षांपासून नैसर्गिक संकटापासून त्रस्त झाला आहे. कधी अतिवृष्टी, तर कधी दुष्काळ या संकटांमुळे शेतकऱ्यांनी पिकांवर केलेला खर्चही उत्पादनातून निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना रबी व खरीप हंगामात पेरणी करण्यासाठी पैशांची आवश्यकता असते. त्यामुळे शेतकरी बँकांकडे पीक कर्जाची मागणी करतो. यावर्षी खरीप हंगामात अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे रबी हंगामात पेरणीसाठी शेतकऱ्यांना पैसे उपलब्ध व्हावेत, यासाठी जिल्हा प्रशासनाने 451 कोटी 87 लाख रुपयांचे उद्दिष्ट बँकांना दिले होते.

मात्र बँकांनी खरीप हंगाम संपला, तरी आतापर्यंत केवळ 29 हजार 989 शेतकऱ्यांना 161 कोटी 67 लाख रुपयांचे पीक कर्जाचे वाटप करीत केवळ 35.78 टक्के उद्दिष्ट गाठले आहे. त्यामुळे यामध्ये बँक व्यावसायिक बँकांनी 4 हजार 228 शेतकऱ्यांना 32 कोटी 73 लाख रुपयांचे वाटप करीत 12.67 टक्के पीक कर्ज वाटप केले आहे. खासगी बँकांनी 1 हजार 11 शेतकऱ्यांना 9 कोटी 60 लाखांचे वाटप केले आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने 5 हजार 139 शेतकऱ्यांना 25 कोटी 37 लाख, तर जिल्हा मध्यवर्ती बँकांनी सर्वाधिक 19 हजार 611 शेतकऱ्यांना 93 कोटी 97 लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करत 84.50 टक्के उद्दिष्ट गाठले आहे. मात्र इतर बँकांनी यावर्षीच्या रबी हंगामात शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करताना आखडता हात घेतल्याचे दिसून येत आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub