प्रजासत्ताक दिनीही शेतकरी आंदोलन सुरूच राहणार!

प्रजासत्ताक दिनीही शेतकरी आंदोलन सुरूच राहणार!

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : नव्या कृषी विधेयकांवरुन देशभरात शेतकरी संघटना आक्रमक झालेल्या असून, नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर हजारोंच्या संख्येने शेतकरी जमलेले आहेत. दरम्यान, शेतकरी आंदोलनावर सर्वोच्च न्यायालयाने 12 जानेवारी रोजी मोठा निकाल जाहीर करत केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याच्या अंमलबजावणीला पुढील आदेशापर्यंत तात्पुरती स्थगिती दिली, तरी मात्र शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. देशाच्या प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारी या दिवशी शेतकरी संघटना कृषी कायद्याविरोधात सुरु असणारे त्यांचे आंदोलन सुरुच ठेवणार आहेत.

दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवीन शेतकरी कायद्यांच्या अंमलबजावणीवर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. चर्चेद्वारे हा प्रश्न सोडवण्यासाठी कोर्टाने एक समितीही स्थापन केली आहे. मात्र, जेव्हा सुप्रीम कोर्टाने या समितीत असणाऱ्या सदस्यांची नावे जाहीर केली तेव्हापासून या समितीच्या नावावरुन वाद सुरु झाला, आणि शेतकऱ्यांनी समितीतील सस्यांचा विरोध केला. दरम्यान, शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असून, ते आपले आंदोलन प्रजासत्ताक दिनीही पार पडणार असल्याचे शेतकरी संघटनांकडून रविवार दि. 17 जानेवारी रोजी स्पष्ट करण्यात आले आहे.

शेतकरी संघटना प्रमुख योगेंद्र यादव यांनी म्हटले आहे की, प्रजासत्ताक दिनी आम्ही दिल्लीतील रिंग रोडच्या बाह्य भागात ट्रॅक्टरचे संचलन अर्थात ट्रॅक्टर परेड करणार आहोत. ही परेड अतिशय शांततापूर्ण मार्गाने पार पडेल. यामध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पार पडणाऱ्या संचलनामध्ये कोणताही व्यत्यय येणार नाही. यावेळी शेतकरी त्यांच्या ट्रॅक्टरवर राष्ट्रध्वज फडकवतील. दरम्यान, दिल्लीत शेतकरी संघटनांच्या प्रस्तावित 26 जानेवारी रोजी होणाऱ्या ट्रॅक्टर रॅलीविरोधात सुप्रीम कोर्टात दिल्ली पोलिसांकडून एक याचिका दाखल करण्यात आली असून, सोमवार दि. 18 जानेवारी सुनावणी होणार आहे.

दिल्ली पोलिसांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की, “प्रजासत्ताक दिन परेड हा राष्ट्रीय अभिमानाशी संबंधित एक कार्यक्रम आहे. आंदोलनाच्या नावाखाली देशाच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर नाचक्की होणाऱ्या कार्यक्रमांना परवानगी दिली जाऊ शकत नाही.” देशात एकिकडे आता हा मुद्दा नव्याने वाद निर्माण करत असण्याची चिन्हे असतानाच दुसरीकडे शेतकरी संघटना नेते दर्शन पाल सिंह यांनी एनआयए या कृषी आंदोलनांमध्ये सहभागी होणाऱ्या किंवा त्यांचे समर्थन करणाऱ्यांविरोधात खटले दाखल करत आहेत, असा आरोप केला. सर्व शेतकरी संघटना या भूमिकेचा निषेध करत असल्याची भूमिकाही त्यांनी मांडली.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub