संत्र्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत

संत्र्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत

अमरावती (प्रतिनिधी) : लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर होत्या. शासनाचे नियंत्रण आणि कारवाईच्या भीतीने व्यापाऱ्यांनी किमती वाढविल्या नाहीत. पण हळूहळू पालेभाज्या तथा फळभाज्या यांच्या किमतीत वाढ होऊ लागली. सरकारने कितीही दावे केले की महागाई आटोक्यात आहे, तरी वास्तव काही वेगळेच आहे. दरम्यान, पालेभाज्या तथा फळभाज्या या सर्वांच्या किंमती वाढल्या असल्या तरी मात्र संत्र्याला भाव नसल्याने अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक पुन्हा चिंतेत सापडले आहेत.

राज्यात या वर्षी अतिपावसामुळे जुलै ते सप्टेंबर या कालावधीत संत्री बागांमध्ये मोठ्या प्रमाणात फळगळ झाली त्यामध्ये संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले, त्या संकटावर मात करून शिल्लक राहिलेल्या संत्रा फळावर लाखो रुपये खर्च करून विविध फवारण्या व उपाययोजना करून फळांची शेतकऱ्यांनी योग्य जपणूक करून त्यांना टिकवून ठेवले. मात्र अचानक आता संत्र्याला भाव मिळत नसल्याने संत्रा उत्पादक शेतकरी पुन्हा चिंतेत सापडले आहेत. दरम्यान, 50 रुपये किलो असलेल्या संत्र्याचा दर केवळ 12 ते 15 रुपये प्रतिकिलोवर आला असून 200 रुपये कॅरेटने शेतकऱ्यांची संत्री विकली जात असल्याचे चित्र आहे.

राज्यात लॉकडाऊनमुळे सर्वत्र वाहतूक बंद होती. शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात संत्री असून देखील संत्र्याला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले. यावर्षी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. यंदा आंबिया बहाराचे उत्पादन चांगले होण्याची आशा संत्रा उत्पादकांना होती. संत्रा उत्पादनाला चांगला भाव मिळून पैसा हातात येईल, या आशेवर असलेला शेतकरी भीषण दुष्काळ, टोळधाड, संत्री फळगळती, संत्रा झाडाची पानगळ, काेरोना, या सर्व संकटांमुळे हवालदिल झाला आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub