शेतकऱ्यांचा आज पुन्हा एकदा भारत बंद!

शेतकऱ्यांचा आज पुन्हा एकदा भारत बंद!

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : कृषी विधेयकांवरुन देशभरात शेतकरी संघटना आक्रमक झाले असून, यासाठी शेतकऱ्यांनी अनेक आंदोलने देखील केली आहेत. नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुमारे चार महिन्यांपासून हजारोंच्या संख्येने शेतकरी जमलेले आहेत. दरम्यान, शुक्रवारी म्हणजेच आज शेतकऱ्यांनी भारत बंदची घोषणा केली आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या म्हणण्यानुसार हा बंद सकाळी 6 ते सायंकाळी 6 या वेळेत असणार असून, अनेक पक्षांनी शेतकऱ्यांच्या भारत बंदला पाठिंबा दर्शविला आहे.

नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीतल्या सीमेवरील शेतकरी संघर्षाला शुक्रवार दि. 26 मार्च रोजी 4 महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी विरोधी सरकारविरोधात भारत बंद करण्यात येत आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या आवाहनावरून देशातील अनेक पक्षांनी शेतकऱ्यांच्या भारत बंदला पाठिंबा दर्शविला आहे. दरम्यान, किसान मोर्चाने सांगितले की, पूर्ण भारत बंद अंतर्गत सर्व दुकाने, मॉल, बाजारपेठा आणि संस्था बंद ठेवल्या जातील. सर्व छोटे-मोठे रस्ते आणि गाड्या रोखण्यात येतील. रुग्णवाहिका व इतर आवश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद राहतील. दिल्लीतही भारत बंदचा परिणाम होईल.

संयुक्त किसान मोर्चाच्या आवाहनावरून विविध शेतकरी संघटना, कामगार संघटना, विद्यार्थी संघटना, बार संघटना, राजकीय पक्ष आणि राज्य सरकार यांच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या भारत बंदला पाठिंबा दर्शविला आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट केले की, बहिऱ्या राज्यकर्त्यांना जागृत करण्यासाठी निर्णायक संघर्ष आवश्यक आहे. सध्याची शेतकरी चळवळ याच दुव्याचा भाग आहे. तीनशे शेतकरी बांधव शहीद होऊनही झोपलेल्या मोदी सरकारला उठवण्याची वेळ आली आहे. 26 मार्चला प्रस्तावित शांततापूर्ण आणि गांधीवादी भारत बंदला आमचा पाठिंबा आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub