अतिवृष्टी झालेली असतानाही शेतकरी मदतीपासून वंचित

अतिवृष्टी झालेली असतानाही शेतकरी मदतीपासून वंचित

परभणी (प्रतिनिधी) : राज्यात एकीकडे कोरोना तर दुसरीकडे राज्यातील अनेक भागांत परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली असून, या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली असून, राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी भरपाई म्हणून 10 हजार कोटी रुपयांच्या मदतीच्या पॅकेजची घोषणा 23 ऑक्टोबर रोजी केली. मात्र, बहुतांश मंडळात अतिवृष्टी ची नोंद झाली असताना जिल्ह्यातील 334 गावांना मात्र अतिवृष्टीच्या मदतीपासून वगळण्यात आले आहे.

जिल्ह्यात अनेक महसूल मंडळामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यात अतिवृष्टी झाली. याशिवाय अतिवृष्टीनंतर ओढ्या-नाल्यांना पूर आल्याने अतिवृष्टीचे मंडळ वगळता इतर मंडळात पुराचे पाणी शिरुन पिकांचे नुकसान झाले आहे. निम्न दुधना, येलदरी प्रकल्पातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केल्याने नद्यांना पूर आला. त्यामुळेही पिकांचे नुकसान झाले आहे. असे असताना जिल्ह्यातील 804 गावांपैकी केवळ 514 गावांमध्येच 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अहवाल प्रशासनाने दिला आहे. त्यात 334 गावांना मात्र वगळण्यात आले आहे.

प्रशासनाच्या अहवालानुसार परभणी तालुक्यातील 100, सेलू तालुक्यातील 33, जिंतूर येथील 112, पाथरी 56, मानवत 53, सोनपेठ 52, गंगाखेड 11 तर पालम येथील 29 आणि पूर्णा तालुक्यातील 86 गावांतील पिके अतिवृष्टीने बाधित झाल्याची नोंद घेतली आहे. या गावांतील पीक नुकसान भरपाईसाठी 108 कोटी 15 लाख 84 हजार रुपयांची मागणी शासनाकडे नोंदविली आहे. त्यामुळे जिल्ह्यात अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झालेली असतानाही त्या गावांचा समावेश अतिवृष्टीच्या यादीत झाला नसल्याने शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत.

प्रशासनाच्या या कारभाराविरुद्ध शेतकऱ्यांत संताप व्यक्त केला जात असून अतिवृष्टी झालेल्या गावांचा यादीत समावेश करून सरसकट मदत द्यावी, अशी मागणी सोमवारी परभणी, जिंतूर आणि सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधींनीही प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान, सेलू तालुक्यातील कुपटा, वालूर, चिकलठाणा या मंडळांमध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. खरीप हंगामातील सोयाबीनचे पीक शेंगा धरण्याच्या अवस्थेत असतानाच सलग पंधरा ते वीस दिवस पाऊस झाला. त्यामुळे या पिकाचे नुकसान झाले आहे. तेव्हा पिकांची आणेवारी काढून सरसकट पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *