बाजार बंदच्या सूचना देताच शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकला

बाजार बंदच्या सूचना देताच शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकला

जिंतूर (परभणी) : कोरोनाच्या संक्रमणावर मात करण्यासाठी जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात झालेली असताना मात्र, शहरातील नागरीकांचा हलगर्जीपणाचा कळस झाला असल्याचे दिसून येते. कुणीही कुठेही विनामास्क फिरणे, गर्दी जमा करणे असे प्रकार घडत असल्याने, या सर्व घटनांवर तातडीने दखल घेत शहरातील विविध भागात दंडात्मक कारवाई करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. दरम्यान, जिंतूर तालुक्यातील आडगाव येथील आठवडी बाजारात शनिवार दि. 27 फेब्रुवारी रोजी पाहणीसाठी आलेल्या पथकाने बाजार बंद करण्याच्या सूचना करताच शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला भाजीपाला पथकासमोरच रस्त्यावर फेकून संताप व्यक्त केला.

राज्यासह जिल्ह्यातही कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी खबरदारीच्या उपाययोजनांतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. आडगाव हे तालुक्यातील शहरी गाव असून औंढा-जिंतूर तालुक्याच्या हद्दीवरचे मध्यवर्ती ठिकाण आहे. शनिवार येथील आठवडी बाजारचा दिवस असून, तालुक्यातील अनेक ठिकाणचे तसेच परिसरातील 10 ते 15 गावामधील लहानलहान व्यापारी, शेतकरी भाजीपाला व शेतमालाच्या विक्रीसाठी येथील बाजारात येतात. त्यामुळे आदेशाच्या अंमलबजावणीची पाहणी करण्यासाठी तहसीलदार सखाराम मांडवगडे यांच्या सुचनेवरून नायब तहसीलदार परेश चौधरी, मंडळ अधिकारी प्रशांत राखे, तलाठी नितीन बुड्डे, शेख अकबर यांच्यासह इतर महसूल कर्मचारी व सहाय्यक पोलीस निरीक्षक चौरे, बिट जमादार दुधाटे यांचे पथक बाजारात आले होते.

शनिवार दि. 27 फेब्रुवारी रोजी पथक पाहणीसाठी बाजारात आले असता येथील बाजारात नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून आल्याने पथकातील अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना बाजार बंद असल्याबाबत सुचना दिल्या. त्यामुळे अगोदरच शेतीसह अनेक प्रापंचिक समस्यांनी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या भावना अनावर झाल्या. त्यांनी शासन व प्रशासनाच्या धोरणावर आक्रमक होत जगायचे कसे ते सांगा? असा सवाल करून विक्रीसाठी आणलेला भाजीपाला पथकासमोरच रस्त्यावर फेकून संताप व्यक्त केला. यावेळी भाजीपाला विक्रेत्या शेतकऱ्यांचा रूद्रावतार पाहून पथकाने तेथून काढता पाय घेतला.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub