कृषी सुधारणा कायदे कृषीक्षेत्राचे भविष्य पालटणार : प्रकाश जावडेकर

कृषी सुधारणा कायदे कृषीक्षेत्राचे भविष्य पालटणार : प्रकाश जावडेकर

पणजी : संसदेचे पावसाळी अधिवेशन 14 सप्टेंबर पासून सुरु झाले असून, या अधिवेशनात अनेक गोष्टी पहिल्यांदाच घडत आहेत. मोदी सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांवरुन देशभरात शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. दरम्यान, तीन कृषी सुधारणा कायदे देशातील कृषीक्षेत्राचे भविष्य पालटतील असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले. नवीन कायदे कृषी क्षेत्राला ग्रासून टाकणाऱ्या मूलभूत समस्यांचे निराकरण करतील असे प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री जावडेकर म्हणाले की, बरीच वर्षे वंचित राहिलेला शेतकरी आता आपल्या कृषीमालाचे मूल्य ठरवण्यास सक्षम होईल. स्वतःच्या शेतातील उत्पादन कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये विकायचा की खुल्या बाजारात हा पर्याय त्याला खुला राहील. शेतीमाल कोणत्या दराने विकायचा याचेही अधिकार शेतकऱ्याला मिळालेले आहेत. नवीन कृषी सुधारणा कायदे ‘एक राष्ट्र एक बाजारपेठ’ या शासनाच्या दूरदृष्टीच्या धोरणांशी सुसंगत आहेत.

कृषि क्षेत्रातील नवीन सुधारणा कायद्यानुसार कंत्राटी शेतीतही मालकी शेतकऱ्याकडेच राहिल याची खात्री देण्यात आली आहे. कंत्राट हे फक्त पिकांच्या बाबतीत असेल. कंत्राटी शेतीमुळे नवीन तंत्रज्ञान, नवीन बियाणे, आणि गुंतवणूक कृषी क्षेत्रात येईल. कित्येक वर्षे कमी उत्पादकता ह्या एकाच गंभीर समस्येने शेतकऱ्यांना भेडसावले होते. कृषी क्षेत्रातील गुंतवणूक वाढली की तंत्रज्ञानाचा वापर वाढेल तसेच नवीन बियाणांमुळे उत्पादकता ही वाढेल, असे जावडेकर यांनी सांगितले.

सरकारने लागू केलेल्या कृषी सुधारणा विधेयकांबद्दल अनेक अफवा पसरल्या आहेत आणि हेतूपुरस्सर पसरवल्या जात आहेत. मात्र यात काही तथ्य नाही. कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे अस्तित्व अबाधित राहील. तसेच किमान हमी भावाची पद्धतही सुरू राहील. आपल्या शेतकऱ्यांचे सर्वात मोठे दुर्दैव आहे की मध्यस्थाला शेती करण्याचा काहीही अनुभव नसताना शेतकऱ्यांपेक्षा जास्त मोबदला मिळतो. अशा मध्यस्थांचे हितसंबंध दु:खावले गेल्यामुळे या कायद्याविरुद्ध आवाज उठवला जात आहे असेही ते म्हणाले.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *