शेतकऱ्यांना सरसकट मदत करा : देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांना सरसकट मदत करा : देवेंद्र फडणवीस

परभणी (प्रतिनिधी) : राज्यात एकीकडे कोरोना तर दुसरीकडे राज्यातील अनेक भागांत परतीच्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने, अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले असून, बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्यातील विविध भागांत दौरे करीत आहेत. दरम्यान, फडणवीस बुधवारी परभणी आणि हिंगोली दौऱ्यावर होते.

संपूर्ण राज्यामध्ये कधी नव्हे एवढा पावसाने हाहाकार माजविला. शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, ही पिके पूर्णपणे वाया गेली आहेत. त्यामुळे राज्यातील महा विकास आघाडीच्या सरकारने पालकत्वाची जबाबदारी निभावून शेतकऱ्यांना तात्काळ मदत केली पाहिजे. हे सरकारचे कर्तव्य आहे, परंतु मदत करण्याऐवजी केंद्र सरकारकडे बोट दाखवून हे सरकार आपली जबाबदारी झटकत आहे. सरकारने पालकत्वाची भूमिका पार पाडावी व शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी केली आहे.

फडणवीस पुढे म्हणाले की, वारंवार राज्यातील मंत्री केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहेत. जीएसटीचे पैसे थकविल्याचा आरोप करणाऱ्यांनी थोडासा विचार करावा. जीएसटीचा परतावा हा संपूर्ण देशामध्ये प्रत्येक राज्याला दिला जातो त्याप्रमाणे तो परतावा महाराष्ट्राला मिळणार आहे. परंतु केवळ अतिवृष्टी बाधित नुकसानीचे लक्ष विचलित करण्यासाठी केंद्र सरकारकडे वारंवार बोट दाखविले जात असल्याचे ते म्हणाले. भारतीय जनता पार्टी खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी उभी राहणार असून यापुढे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन केले जाणार असल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बुधवार दि. 21 ऑक्टोबर रोजी परभणी, हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना झिरो फाटा येथे अतिवृष्टी बाधित नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांनी यावेळी जाणून घेतल्या. त्यावेळी त्यांच्या समवेत राज्याच्या माजी मंत्री व भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, माजीमंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे होते. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांची भेट घेतली.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub