लोकप्रियतेसाठी घोषणा करणाऱ्यातला मी नाही : मुख्यमंत्री ठाकरे

लोकप्रियतेसाठी घोषणा करणाऱ्यातला मी नाही : मुख्यमंत्री ठाकरे

उस्मानाबाद (प्रतिनिधी) : राज्यात एकीकडे कोरोना तर दुसरीकडे राज्यातील अनेक भागांत परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली असून, या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नुकसानग्रस्त भागांच्या दौऱ्यावर असून ते सध्या उस्मानाबादमध्ये आहेत. त्यांनी मंगळवारी सोलापुरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली असून, पंचनामे करुन सरकार मदत करणार आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत जाहीर करु असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.

उद्धव ठाकरे यांनी उस्मानाबादमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथे त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलतांना म्हणाले की, महाराष्ट्र मला नवीन नाही. यापूर्वी जेव्हा आलो तेव्हा मुख्यमंत्री नव्हतो. तुमच्या वेदना, व्यथांना आवाज देण्याचे काम मी तेव्हा करत होतो. माझे कर्तृत्व शून्य आहे, पण तुमच्या आशिर्वादामुळे मुख्यमंत्री झालो आहे. पुढे ते म्हणाले की, आजची परिस्थिती भयानक आहे. आपण संकटाचा सामना केला नाही असे नाही. वर्षाची सुरुवातच जागतिक संकटाने झाली आहे. बाहेर पडू म्हणताच निसर्ग वादळ आले आणि जाता जाता पावसाने तडाखा दिला.

मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले की, आम्ही परिस्थितीचा अंदाज घेत आहोत. अतिवृष्टी होण्याचा धोका कमी झाला आहे. पण पुढील सात ते आठ दिवस वातावरण बिघडू शकते असे हवामान विभागाने सांगितले आहे. सवंग लोकप्रियतेसाठी घोषणा करणाऱ्यातला मी नाही. जे बोलतो ते मी करतो, पण करू शकत नाही असे बोलत नाही. तुम्ही सर्वजण मला ओळखता. तुम्हाला बरे वाटावे, टाळ्या वाजवाव्यात यासाठी आकडा जाहीर करणार नाही. मी दिलासा देण्यासाठी आलो आहे, येत्या दोन ते तीन दिवसांत मंत्रीमंडळ बैठक घेऊन मदतीचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub