अवकाळी पावसाने मराठवाड्यातील रबी हंगामाचे नुकसान!

अवकाळी पावसाने मराठवाड्यातील रबी हंगामाचे नुकसान!

औरंगाबाद (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण राज्यात कोरोना संक्रमणावर मात करण्यासाठी लसीकरणाला सुरुवात झाली आहे. असे असले तरी मात्र, पुन्हा कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याचे समोर येत आहे. त्यातच अवकाळी पावसाने मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात हजेरी लावली. दरम्यान, मराठवाड्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 15 तालुक्यांतील 332 गावांतील रबी हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक पंचनाम्यानुसार विभागातील जालना, परभणी आणि औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत पिकांचे नुकसान झाले आहे.

राज्यात कोरोना पुन्हा रूग्णांची संख्या वाढत असतानाच मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात 17, 18 आणि 19 फेब्रुवारी रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे रबी हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, परभणी, जालना, औरंगाबाद, बीड आणि उस्मानाबाद विभागात एकूण 8 हजार 500 गावे आहेत. त्यातील 294 गावांना गारपिटीने झोडपले. सर्व जिल्ह्यांत मिळून सरासरीच्या तुलनेत 30 मि.मी.च्या आसपास अवकाळी पाऊस झाला. यात 3 व्यक्तींचा मृत्यू तर 5 जण जखमी झाले आहेत. तसेच 27 लहान आणि 21 मोठे जनावरे देखील दगावली आहेत.

मराठवाड्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जिरायती, बागायती आणि फळपिके मिळून 43 हजार 383 हेक्टर क्षेत्रांवरील पिकांचे नुकसान झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील 9 पैकी 5 तालुक्यांत 134 गावांत नुकसान झाले. 38 हजार 245 हेक्टरवरील पिके गारपिटीने आडवी केली. जालना जिल्ह्यातील 3 तालुक्यांतील 42 गावांतील 568 हेक्टर, परभणी जिल्ह्यातील 1 तालुक्यांतील 38 गावांतील 2152 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. लातूर, नांदेडमध्ये, हिंगोलीत काही नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील 3 तालुक्यांतील 3349 हेक्टरवरील तर उस्मानाबाद जिल्ह्यातील 4 तालुक्यातील 1221 हेक्टवरील पिकांचे नुकसान झाले आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub