जिल्ह्यात परतीच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान

जिल्ह्यात परतीच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान

परभणी (प्रतिनिधी) : राज्यात एकीकडे कोरोना तर दुसरीकडे पावसाची हजेरी सुरूच आहे. दरम्यान, राज्यातील अनेक भागांत परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली असून, या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, परतीच्या पावसाने परभणी जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या तुटलेल्या कापसाच्या वाती झाल्या असून, काढून ठेवलेल्या सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात परतीच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसाने नद्या-नाल्यांना पूर आला. यामुळेही जिल्ह्यात पिकांची अतोनात हानी झाली. मागील पंधरा दिवसापूर्वी परभणीसह जिल्ह्यात  पाऊस धो-धो बरसला. या पावसामुळे जिल्ह्यातील 46 हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीचे अद्यापही संपूर्ण पंचनामे झाले नाहीत, तोच आता परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून, या पावसाने कापसाचे मोठे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर कापूस मोठ्या प्रमाणात फुटला होता. काही शेतकऱ्यांनी कापसाची वेचणी केली असली तरी बहुतांश शेतकऱ्यांची कापसाची वेचणी राहिली होती. या पावसाने फुटलेल्या कापसाच्या वाती झाल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. सोयाबीनचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून ठेवले आहे. अनेकांची काढणी सुरू आहे. मात्र परतीच्या पावसाने सोयाबीन पूर्णतः भिजली आहे.

परतीच्या पावसामुळे पाथरी, सेलू, मानवत, पूर्णा, परभणीसह अन्य तालुक्यातील नदी-नाल्यांना पाणी आले होते. सर्वच ठिकाणच्या नद्या तुडुंब वाहत आहेत. नद्यांना आलेल्या पुरामुळे जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी खरिपाच्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या हाती काहीच पडले नाही. त्यामुळे रब्बीची पेरणी कशी करावी? हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *