शेतकऱ्यांकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही : कृषीमंत्री

शेतकऱ्यांकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही : कृषीमंत्री

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : कृषी विधेयकांवरुन देशभरात शेतकरी संघटना आक्रमक झाले असून, यासाठी शेतकऱ्यांनी अनेक आंदोलने देखील केली आहेत. नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर हजारोंच्या संख्येने शेतकरी जमलेले आहेत. गेल्या 58 दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असून, केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये अकराव्या फेरीची बैठक शुक्रवार दि. 22 जानेवारी रोजी झाली असून, ही बैठक देखील निष्फळ ठरली आहे. पुढील बैठकीची तारीख अद्याप ठरलेली नसून, या बैठकीत कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी आपले मत मांडले.

नवी दिल्लीत शेकतकरी संघटना आणि सरकार यांच्यात अकराव्या फेरीची बैठकही शुक्रवारी झाली. मात्र ही बैठक देखील इतर बैठकींप्रमाणेच निष्फळ ठरली असून, या बैठकीत कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की, अकराव्या फेरीत चर्चा झाली आहे. मात्र, अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. ते म्हणाले की सरकारकडून सर्वोत्कृष्ट प्रस्ताव देण्यात आला आहे, त्याचा शेतकऱ्यांनी विचार केला पाहिजे. ते पुढे म्हणाले की, मी हे कठोर अंतःकरणाने सांगतोय की शेतकर्‍यांकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही हे दुर्दैवी आहे.

दरम्यान, 20 जानेवारी रोजी झालेल्या दहाव्या फेरीतील बैठकीत केंद्र सरकारने कृषी कायदे दीड वर्षासाठी कायदा स्थगित करण्यास तयार आहोत, असा प्रस्ताव शेतकरी नेत्यांना दिला होता. यावेळी, सरकार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची समिती या कायद्यांवर सविस्तर चर्चा करेल आणि यातून मार्ग काढेल. मात्र, हा प्रस्ताव गुरुवारी झालेल्या बैठकीनंतर शेतकरी नेत्यांनी फेटाळला असून, सर्व केंद्रीय कृषी कायदे पूर्णपणे रद्द करुन सर्व शेतकर्‍यांसाठी सर्व पिकांवर लाभदायक एमएसपीसाठी नवीन कायदा करण्याची चर्चा या आंदोलनातील मुख्य मागणी म्हणून पुन्हा सांगितली आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub