देशाबाहेरील कांदा उत्पादकांना देशात पायघड्या

देशाबाहेरील कांदा उत्पादकांना देशात पायघड्या

मुंबई (प्रतिनिधी) : लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर होत्या. शासनाचे नियंत्रण आणि कारवाईच्या भीतीने व्यापाऱ्यांनी किमती वाढविल्या नाहीत. पण हळूहळू पालेभाज्या तथा फळभाज्या यांच्या किमतीत वाढ होऊ लागली. सरकारने कितीही दावे केले की महागाई आटोक्यात आहे, तरी वास्तव काही वेगळेच आहे. या महागाईत सर्वसामान्य माणूस हैराण झाला असून, कांदा, बटाटा, तेल, राई, जिरे, पालेभाज्या, फळभाज्या, फळे या सर्वांच्या किंमती वाढल्या असून, केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदीचा निर्णय घेतला. कांद्याच्या निर्यातीवर बंदी लादून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रोष असताना आता देशाबाहेरच्या कांदा उत्पादकांना देशात पायघड्या घातल्या जात आहेत.

देशात सध्या कांद्याचे भाव वाढले आहेत. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. नवी मुंबईच्या एपीएमसीमध्ये कांद्याचा घाऊक भाव 90 रुपयांच्या घरात गेला आहे. तर लवकरच कांदा शंभरी गाठण्याची शक्यता आहे. आता कांद्याचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. दरम्यान, कांद्याच्या निर्यातीवर बंदी लादून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रोष असताना आता देशाबाहेरच्या कांदा उत्पादकांना देशात पायघड्या घातल्या जात आहेत. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आणखी आक्रमक होण्याची चिन्हे असून, गेल्या दहा दिवसात कांद्याचे भाव बारा रुपयांवरून 50 रुपयांच्या जवळपास पोहोचला आहे. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचा केंद्र सरकारचा दावा आहे.

केंद्र सरकारकडून कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांनी या निर्णयाचा विरोध केला होता.  केंद्र सरकारच्या अशा आकस्मिक निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याचा एक खात्रीशीर निर्यातदार देश म्हणून भारताची जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेला मोठा धक्का बसतो असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले होते. तर केंद्र सरकारने विदेश व्यापार कायदा 1992 अंतर्गत कांद्याच्या निर्यातीवर बंदी लादून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा गंभीर विश्वासघात केला आहे. अगोदरच कोरोना महामारीमुळे शेतकरी हवालदिल झाला असताना केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांवर मोठा आघात होत असल्याची प्रतिक्रिया आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub