परभणी जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीस सुरुवात

परभणी जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीस सुरुवात

परभणी (प्रतिनिधी) : राज्यात एकीकडे कोरोना तर दुसरीकडे राज्यातील अनेक भागांत परतीच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली असून, राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी भरपाई म्हणून 10 हजार कोटी रुपयांच्या मदतीच्या पॅकेजची घोषणा 23 ऑक्टोबर रोजी केली. दरम्यान, जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने रब्बी हंगामाअंतर्गत ज्वारीची पेरणी होण्याचे नियोजन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. सद्यस्थितीत पेरण्यांना शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे.

जिल्ह्यात यावर्षी अनेक महसूल मंडळामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यात अतिवृष्टी झाली. याशिवाय अतिवृष्टीनंतर ओढ्या-नाल्यांना पूर आल्याने अतिवृष्टीचे मंडळ वगळता इतर मंडळात पुराचे पाणी शिरुन पिकांचे नुकसान झाले आहे. खरीप पिकांना याचा फटका बसला असला तरी रब्बी हंगामात झालेल्या पावसाचा शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. त्या दृष्टीकोनातून शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पेरण्यांना सुरुवात केली असून, कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्यात 1 लाख 16 हजार 419 हेक्टर जमिनीवर ज्वारीच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे.

राज्यात तथा जिल्ह्यात यावर्षी चांगला पाऊस झाल्याने जमिनीमध्ये ओलही अधिक आहे. शिवाय विहीरी आणि बोअरवेल यांना पाणीही चांगले आहे. त्यामुळे गव्हाच्या पिकासाठी पोषक वातावरण असून, या पिकाच्या लागवडीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 28 हजार 571 हेक्टर जमिनीवर गव्हाची लागवड करण्याचे कृषी विभागाने निश्चित केले आहे. याशिवाय जिल्ह्यात 63 हजार 663 हेक्टर जमिनीवर हरभऱ्याची पेरणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हरभऱ्याचा बाजारात मिळणारा चांगला भाव पाहता या पिकाच्या पेरणीतही वाढ होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात गहू आणि ज्वारी सोबतच रब्बीतील इतर पिकांमध्ये 3 हजार 494 हेक्टरवर करडई, 116 हेक्टरवर जवस, 17 हेक्टरवर तीळ, 48 हेक्टरवर सूर्यफूल तर 3 हजार 834 हेक्टरवर गळीत धान्याची लागवड होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कृषी विभागाने जिल्ह्यात 2 लाख 15 हजार 991 हेक्टर जमिनीवर रबी हंगामातील पिकांची पेरणी होईल, अशी शक्यता वर्तविली आहे. खरीप हंगामात अनुउत्पादक राहिलेल्या जमिनीचा रब्बी पिकांच्या पेरणीसाठी वापर होणार आहे. त्यामुळे कृषी विभागाने निश्चित केलेल्या क्षेत्रापेक्षा अधिक जमिनीवर पेरणी होण्याची शक्यता आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub