बीड प्रकरणी आरोपीस आठ दिवसांची पोलीस कोठडी

बीड (प्रतिनिधी) : देशात एकीकडे कोरोना तर दुसरीकडे धक्कादायक घटना थांबण्याचे नावच घेत नाही. कोरोनाच्या या काळात उत्तर प्रदेशातील हाथरस येथील तरुणीवरील सामूहिक अत्याचाराचे प्रकरण त्यानंतर हरयाणामधील बल्लभगड येथे एका विद्यार्थिनीची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या या घटना ताज्या असतानाच शनिवार दि. 14 नोव्हेंबर रोजी बीड येथे तरुणीवर ऍसिड हल्ला करुन तिला पेट्रोल टाकून जाळून मारल्याबद्दल आरोपीस अटक करण्यात आली असून, सत्र न्यायालयाने या आरोपीस 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
देशात सुरू असलेल्या अशा घटनांमुळे लोकांचा राग शिगेला पोहोचला असून, बीड प्रकरणातील आरोपी अविनाश राजुरे याला सत्र न्यायालयाने 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, दिवाळीसाठी पुण्याहून गावी परतणाऱ्या तरुणीवर अॅसिड हल्ला करून नंतर पेट्रोल टाकून जिवंत जळल्याची घटना येळंबघाट (ता. बीड) येथे घडली होती. गंभीररित्या भाजलेल्या तरुणीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असतांना रविवारी पहाटे तिचा मृत्यू झाला, त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणातील आरोपी व मृत तरुणी दोघे पुण्यात सोबत राहत होते अशी माहिती समोर आली आहे.
नांदेड जिल्ह्यातील शेळगाव (ता. देगलूर) येथील तरुणी गावातीलच एका तरुणासोबत गेल्या काही दिवसांपासून पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. 13 नोव्हेंबर रोजी रात्री दोघेही पुण्याहून गावी परतण्यासाठी दुचाकीवरून जात होते. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास येळंबघाट (ता. बीड) परिसरात निर्मनुष्य ठिकाणी मांजरसुंबा–केज मुख्य रस्त्यावरून जात असताना तरुणाने दुचाकी थांबवली. तरुणीला रस्त्याच्या कडेला घेऊन तिच्यावर अॅसिड टाकले. त्यांनतर काही वेळाने त्याने पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले.
तरुणीला पेटवून दिल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. अॅसिड हल्ला आणि पेट्रोलने 48 टक्के शरीर भाजले होते. अर्धवट भाजलेल्या अवस्थेत तरुणी तब्बल 12 तास रस्त्याशेजारी पडून होती. दुपारी 2 वाजता काही वाहनधारकांना आवाज आल्याने त्यांनी खड्यात पहिले असता अर्धवट जळालेल्या अवस्थेतील तरुणी दिसल्याने याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. पीडितेचा जबाब नोंदवण्यात आल्यानंतर आरोपीस अटक करण्यात आली असून, सत्र न्यायालयाने या आरोपीस 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Click here to join the WhatsApp group.