पुण्यात शौचास गेलेल्या महिलेचा विनयभंग

पुण्यात शौचास गेलेल्या महिलेचा विनयभंग

पुणे (प्रतिनिधी) : देशात एकीकडे कोरोना तर दुसरीकडे धक्कादायक घटना थांबण्याचे नावच घेत नाही. कोरोनाच्या या काळात उत्तर प्रदेशातील हाथरस येथील तरुणीवरील सामूहिक अत्याचाराचे प्रकरण अत्यंत क्लेशदायक, संतापजनक आणि लाजिरवाणी असून, हे प्रकरण ताजे असतानाच हरयाणामधील बल्लभगड येथून एका विद्यार्थिनीची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली. देशात सुरू असलेल्या बलात्काराच्या घटनांमुळे लोकांचा राग शिगेला पोहोचला आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील पुण्यात विनयभंगाचा विरोध केल्याने आरोपीने केलेल्या मारहाणीत महिलेचे दोन्ही डोळे निकामी झाल्याची घटना घडली आहे.

पुणे जिल्ह्याच्या शिरुर तालुक्यातील न्हावरे गावात मंगळवार दि. 03 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, एक 37 वर्षीय महिला घराशेजारीच शौचासाठी गेली होती. परंतु यावेळी जवळच्याच झुडपात दबा धरुन बसलेल्या आरोपीने तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. महिलेने छेडछाडीला विरोध केल्याने आरोपीने तिला जबर मारहाण केली. यात महिलेचे दोन्ही डोळे निकामी झाले आहेत. पीडित महिलेवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणातील आरोपी पसार झाला असून, शिरुर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

शिरुर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत आरोपीविरोधात विनयभंग आणि प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. महिलेवर हा जीवघेणा हल्ला कोणी आणि कशासाठी केला याचा तपास शिरुर पोलीस करत आहेत. दरम्यान, न्हावरे गावात एका महिलेवर अज्ञाताने निर्घृण हल्ला केला. यात महिला गंभीर जखमी झाली असून तिला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आम्ही घटनास्थळी आलेलो असून नेमके काय घटना घडली याची माहिती घेतली. पोलीस पुढील तपास करत आहेत. लवकरात लवकर आरोपीला अटक करु अशी अपेक्षा आहे, अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिली आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub