महिलांवरील वाढता अत्याचार!

महिलांवरील वाढता अत्याचार!

देशात एकीकडे कोरोना तर दुसरीकडे महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नावच घेत नाही. कोरोनाच्या या काळात उत्तर प्रदेशातील हाथरस येथील तरुणीवरील सामूहिक अत्याचाराचे प्रकरण त्यानंतर हरयाणामधील बल्लभगड येथे एका विद्यार्थिनीची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या या घटना ताज्या असतानाच 14 नोव्हेंबर रोजी बीड येथे तरुणीवर ऍसिड हल्ला करुन तिला पेट्रोल टाकून जाळून मारल्याची घटना, त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात एका अपंग मुलीवर बलात्कार केल्याची घटना आणि आता 19 नोव्हेंबर रोजी पतीने भरधाव वेगातील ऑटोरिक्षाचा अपघातकरून पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना गंगाखेड तालुक्यात घडली असून, देशात महिलांवरील वाढता अत्याचार पाहूण लोकांचा राग शिगेला पोहोचला आहे.

सामाजिक विषमता ही जात, धर्म आणि लिंग या तीन घटकावर आधारित आहे. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना नेहमीच दुय्यम स्थान मिळत आले आहे. स्त्री ही केवळ उपभोगाची वस्तू आहे अशी पारंपारिक, प्रतिगामी मानसिकता आहे. गेल्या अनेक वर्षात स्त्रियांवर होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. स्त्रियांवरील अन्याय/अत्याचार दूर करण्यासाठी प्रभावी कायदे आणि त्याची कठोर अंमलबजावणी आवश्यक आहेच, परंतु त्याबरोबरच आवश्य आहे ती जनजागृती. स्त्रियां/मुलींना मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे आहे आणि शाळा, कॉलेज, स्वयंसेवी संस्था यांनी प्रयत्न करून हे उपक्रम राबवले पाहिजेत.

आजकाल प्रेमप्रकरणांमध्ये झालेली वाढ लक्षात घेता मुलगा आणि मुलगी या दोघांचेही समुपदेशन करण्याची गरज आहे. प्रेम करणे ही वाईट गोष्ट नाही. परंतु प्रेमाच्या नावाखाली अश्लीलतेचा जो नंगानाच चालू असतो, तो फार भयंकर आहे. महाविद्यालयीन तरुण-तरुणी यात फारच आघाडीवर आहेत. अनेक तरुणांची जी प्रेम प्रकरणेचालू आहेत, त्यापैकी काही आपल्या जोडीदाराबरोबर निर्जन स्थळी जावून अश्लील चाळे करतात. हे निश्चितच सामाजिक हिताचे लक्षण नाही. प्रेम ही उदात्त भावना बाजूलाच राहते आणि वासनेचा बाजार सुरु होतो. अशा घटनांमध्ये बहुतांशी वेळा मुलीच बळी ठरतात.

महिलांना आजच्या युगात दिले जाणारे स्थान हे खालच्या पातळीचे आहे. परंतु आता सरकारने केलेले कायदे हे फार महत्त्वाचीभूमिका पार पडत आहेत. महिलांना दिले जाणारे स्थान आता हल्लीच्या काळात बदलत जात आहे. परंतु हा बदल होत असताना असे जाणवते की, खरच हा बदल होतो आहे का? कारण आपण प्रत्येकजण म्हणतो की, स्त्रियांना त्यांचे सर्व अधिकार दिले गेले पाहिजेत. त्यांचे हक्क प्रदान केले पाहिजेत. पण आजही अनेक ठिकाणी मुलगी जन्मास आली कि, तिला घरातुनच वागणूक व्यवस्थित मिळत नसल्याचे दिसते. हीच स्त्री आज पुरुषाच्या खांद्यास खांदा लाऊन प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तुत्व सिद्ध करीत असतानाही तिला आजही पुरुषी अंहमपनाचा सामना करावा लागत आहे.

स्त्रियांवर होणाऱ्या कौटुंबिक आत्याचाराला स्त्रियाही जबाबदार

स्त्रियांवर होणाऱ्या कौटुंबिक आत्याचाराला जेवढे पुरुष जबाबदार आहेत, तेवढ्याच स्त्रियाही जबाबदार आहेत कारण कायद्याच्याच भाषेत सांगायचे झाले तर अन्याय करणाऱ्या इतकाच अन्याय सहन करणाराही गुन्हेगार असतो. आपल्याकडे फक्त कुटुंबांमध्येच महिला आणि मुलींवर अत्याचार होतो असे नाही. रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी महिलांची छेड काढली जाते, त्यांच्याकडे बघून विक्षिप्त असे हावभाव केले जातात, मुलींना नाना प्रकारचा त्रास दिला जातो, विनयभंग केला जातो. अनेकदा तर सार्वजनिक ठिकाणी महिलांनी जाऊ की नये, असा विचार करावा लागतो. त्यामुळे समाजात जेव्हा अशा घटना घडतात, तेव्हा फक्त पीडित मुली वा महिलांनीच प्रतिकार केला पाहिजे असे नव्हे, तर ही दृश्य बघणार्‍या प्रत्येकाने असले घृणित कृत्य हाणून पाडले पाहिजे.

आपल्यापैकी प्रत्येकाला आई, बहीण आहे, मावशी आहे, अत्या आहे, पत्नी आहे, मुलगी आहे. त्यामुळे वाईट प्रसंग आपल्याही आई-बहिणीवर गुदरू शकतो, याची जाण असूनही आपल्यापैकी अनेक लोक महिलांवर अत्याचार करतात, ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे. स्त्रीकडे भोगवस्तू म्हणून पाहण्याची आमची दृष्टीच स्त्रियांविरुद्धच्या अत्याचारास कारणीभूत आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. आज जो प्रसंग इतर मुलींवर गुदरला तो उद्या आपल्यापर्यंत येऊन पोहोचला तर? या तरचा विचार करून अशा घटनांचा समाजाने सामूहिक प्रतिकार केला तर असे प्रकार हळूहळू कमी होतील, यात शंका नाही.

देशात स्त्रियांवरील आत्याचार आणि बलात्कार होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे देशभरात अनेक वाद नव्याने निर्माण होत आहेत. प्रसारमाध्यमे ही ते वाद चवीने चघळत असून, देशातील प्रत्येक सुजान नागरिकाने शांतपणे आणि विचारपूर्वक या समस्येकडे पाहायला हवे. स्त्रियांना आता असुरक्षित वाटू लागत असले तरी आपल्या देशात स्त्रियांची सुरक्षितता, त्यांच्यावर होणारे अत्याचार आणि त्यांच्यावर होणारे बलात्कार या तिन्ही गोष्टीकडे थोड्या वेगवेगळ्या दृष्टीने पाहायला हवे. आपल्या देशात फक्त स्त्रियाच असुरक्षित आहेत असे नाही. देशभरात सुरक्षे अभावी कित्येक पुरुषांनाही आपले प्राण गमवावे लागत आहेत याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

स्त्रियांवरील आत्याचारासाठी सरसकट सर्व पुरुषांना दोषी ठरवणे कितपत योग्य?

देशभरात स्त्रियांवरील वाढत्या आत्याचारासाठी सरसकट सर्व पुरुषांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण योग्य होणार नाही कारण स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या अत्याचाऱ्यांचा नाश करण्यासाठी लाखो परूषांनी आपले प्राण संकटात टाकले आहेत हे विसरून चालणार नाही. स्त्रियांवर अत्याचार करणारा एक पुरूष असतानाही आपले संरक्षण करण्याची जबाबदारी दुसऱ्या पुरूषानेच घ्यायला हवी अशी अपेक्षा स्त्रियांनी करणे ते ही स्त्री-पुरुष समानतेच्या काळात योग्य नाही. आता आपल्या देशातील प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या रक्षणाची जबाबदारी स्वतःच घ्यायला हवी, देशातील प्रत्येक स्त्रीने स्वसंरक्षणासाठी सज्ज असायलाच हवे.

आपल्या देशात हजारो वर्षात स्त्रीची जी प्रतिमा तयार झालेली आहे ती आता बदलायला हवी. पुरुषांसारखाच आपल्या डोळ्यातील अश्रूवर स्त्रीयांनीही ताबा मिळवायलाच हवा. आपल्या देशातील स्त्रियांवरील आत्याचार रोखण्यासाठी आपल्या देशातील पुरुषांची मानसिकता बदलायला हवी. नग्नता अश्लिलता ही प्रत्यक्षात नसते, ती पाहणाऱ्याच्या नजरेत असते. त्यामुळे परूषांनी प्रथम स्त्रियांकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टीत आणि दृष्टीकोणात बदल करायला हवा. आज स्त्रिया प्रत्येक बाबतीत, प्रत्येक क्षेत्रात पुरूषांच्या खाद्याला खांदा लावून चालत असताना जी कामे खास स्त्रियांची म्हून समजली जातात ती सर्वच्या सर्व कामे करण्याची मानसिक तयारी आज आपल्या देशातील किती पुरुषांची असते.

समाजात, ज्या देशात दर 78 मिनिटांनी एक हुंडाबळी जातो, दर 59 मिनिटांनी एक महिलेवर लैंगिक अत्याचार होतो, दर 34 मिनिटांनी बलात्काराचे एक प्रकरण घडते, दर 12 मिनिटांनी एका महिलेला शारीरिक अत्याचाराला सामोरे जावे लागते आणि तीन मुलींपैकी एकीला हुंड्यासाठीचा मानसिक-शारीरिक छळ सहन करावा लागतो, तो देश आणि तो समाज स्त्रियांसाठी सुरक्षित आहे, असे म्हणता येईल का? उत्तर नकारार्थी येत असले तरी यासाठी सरकारी यंत्रणा नव्हे, तर आपली सामाजिक रचना आणि विविध प्रकारच्या रुढी-परंपरा, समाजाची बुरसट मानसिकताच जबाबदार आहे, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरू नये. देशभरात स्त्रियांवर होणारे अत्याचारांना आळा घालायचा असेल तर भारतीय पुरुषांच्या मानसिकतेचा नव्याने अभ्यास करून त्यांची पुरुषी मानासिकता बदलण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे आहेत.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub