डॉ. अब्दुल कलाम; प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व

डॉ. अब्दुल कलाम; प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व

आपला भारत देश हा महान नेत्यांचा देश मानला जातो. या देशामध्ये बरेच काही महान नेता होवून गेले. त्यापैकी एक आहेत, डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम. कलाम यांचे संपूर्ण जीवन म्हणजे विज्ञानाप्रती, देशाप्रती, समाजाप्रती वाहिलेले एक अग्निकुंड आहे. भारताला महासत्ता बनवण्याच्या स्वप्नाने भारलेल्या या महान व्यक्तीचा जन्मदिवस हा जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रपती म्हणून आपला कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना केवळ एक सुटकेस घेऊन राष्ट्रपती भवन सोडताना अनेकांनी पाहिले होते. त्यावेळी त्यांच्याकडे केवळ 2500 पुस्तके, 6 पँट्स, 4 शर्ट, 16 डॉक्टरेटच्या पदव्या, एक पद्मश्री, एक पद्मभूषण आणि भारताचा सर्वोच्च किताब भारतरत्न एवढीच संपत्ती होती.

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी आपल्या कारकीर्दीत भारताला अनेकवेळा अभिमान वाटावा असे काम केले. मग ते इस्रोचे आणि डीआरडीओचे प्रमुख म्हणून कार्य असो, भारताचे पहिले रॉकेट एसएलव्ही-3 बनवण्यात बजावलेली भूमिका असो, ‘पृथ्वी’ आणि ‘अग्नी’ क्षेपणास्त्र असो किंवा जगाला भारताची ताकद दाखवणारा पोखरणचा स्फोट असो. त्यांच्या प्रत्येक कामगिरीने देशाची मान आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचच झाली आहे. पण एवढ्यापुरतेच त्यांच कार्य मर्यादित नाही. त्यांची खरी ओळख ही शिक्षक हीच होती आणि तिच त्यांनी त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत जपली.

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थ्यांशी संवाद साधताना नेहमी त्यांना कानमंत्र द्यायचे. ते म्हणायचे की, “तुम्ही झोपेत पाहता ते स्वप्न नव्हे तर तुम्हाला झोपू देत नाही ते स्वप्न असते.” त्यापुढेही जाऊन ते म्हणायचे की, “कोणतेही स्वप्न हे मोठे नसते आणि कोणताही स्वप्न पाहणारा व्यक्ती हा लहान नसतो, भविष्य त्याचेच असते जो स्वप्न पाहतो आणि ते सत्यात उतरवतो.” ग्रामीण तसेच शहरी भागातील अनेकांसाठी ते खऱ्या अर्थाने प्रेरणादायी होते. दरम्यान, राष्ट्रपती असतानाही त्यांनी देशाचे भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांशी सातत्याने संवाद साधला.

आपल्या देशाने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मिळवलेल्या यशाचे प्रतिक म्हणून दरवर्षी आपण 11 मे रोजी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन साजरा करतो. याच दिवशी 1998 साली तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी पोखरण येथे आण्विक चाचणी घऊन जगाला धक्का दिला होता. या घटनेने भारताची ताकद जगासमोर आली. ही चाचणी अमेरिका आणि जगाच्या नजरेला चुकवून करायची होती. त्याची कुणकुण आधीपासूनच अमेरिकेला होती. त्यामुळे त्याच्या आधी काही वर्षांपासून अमेरिकेचे सॅटेलाईट भारतावर 24 तास नजर ठेऊन होते. तसेच त्यांची गुप्तहेर संघटना CIA ही देखील भारतात कार्यरत होती. यांना चकवा देऊन पोखरणची चाचणी यशस्वी करण्याची जबाबदारी डॉ. कलामांवर येऊन पडली.

या आधी 1974 साली इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी ‘स्मायलिंग बुद्धा’ या नावाने देशाची पहिली अणूचाचणी केली होती. त्यानंतर भारताला अमेरिकेच्या बंधनांना सामोरे जावे लागले होते. त्यानंतरही भारताने त्याचा अणुकार्यक्रम सुरुच ठेवला होता. डॉ. अब्दुल कलाम यांनी विज्ञानच्या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांचे विज्ञान आणि तंत्रज्ञानातील योगदान लक्षात घेता त्यांना 1997 साली ‘भारतरत्न’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांना त्यांच्या मंत्रिमंडळात विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे मंत्रिपद देऊ केले होते, पण त्यांनी ते विनम्रपणे नाकारले. पुढे जाऊन वाजपेयींनीच त्यांना राष्ट्रपती बनवण्यात मोठी भूमिका पार पाडली.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub