नवरात्र: शारीरिक व आत्मिक शुद्धतेचा काल

हिंदु संस्कृतीत धर्माला अनन्यसाधारण असे महत्व आहे. प्रथा, परंपरा, सण अतिशय भक्तिभावाने आणि निष्ठेने साजरे केले जातात. हिंदु धर्मात भगवती देवीची विशेष आराधना केली जाते. नवरात्र हा तर भारतातील अतिशय पवित्र आणि महत्वाचा उत्सव असून, संपुर्ण नऊ दिवस देविची पुजा, अर्चना, आराधना करण्याचा आहे.
नवरात्र हा उत्सव देवी दुर्गेला समर्पित असा उत्सव आहे. संस्कृत मधे नवरात्री या शब्दाचा अर्थ ‘नऊ रात्री’ असा होतो. या नऊ रात्री आणि दहा दिवशी 9 वेगवेगळया देविंची पुजा अर्चना केली जाते. दहाव्या दिवशी विजयादशमी अर्थात दसरा असल्याने या दिवसाला साडे तिन मुहूर्तापैकी एक मानल्या जाते.
भारतातील नवरात्र महोत्सव

भारतात थाटामाटात साजरा करण्यात येणाऱ्या सणांपैकी नवरात्र हा एक सण आहे. पावसाळा बहुतेक संपलेला असतो, शेतांतील पिके तयार होत आलेली असतात, काही तयार झालेली असतात आणि शेतकरी खुशीत असतो. मुख्य नवरात्र सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात येत असते. तेव्हां भाविक आपापल्या कुळाचाराप्रमाणे नवरात्रौत्सवाची स्थापना करीत असतात.
घरी आणि मंदीरात दुर्गेच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करतात देवीला नैवैद्यात फळे आणि फुले वाहिले जातात. लोक एकत्र येउन आरती, गायन आणि भजने देखील म्हणतात. नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते. त्या दिवसापासून महाराष्ट्रात संध्याकाळी अंगणात भोंडला खेळला जातो.
नऊ दिवसांच्या काळात दुर्गादेवी तेजतत्त्वाच्या आधारे आपल्या नऊ प्रमुख शस्त्रांसहित ब्रह्मांडात विहार करते, असा समज आहे. आदिशक्तीचे हे दरदिवशी नव्या रूपासहित भ्रमण करणे, म्हणजेच दरदिवशी चढत्या क्रमाने सप्तपाताळांतून पृथ्वीवर येणार्या त्रासदायक लहरींचे समूळ उच्चाटन करणे, अशी समजूत आहे.
नवरात्रीतील हे नऊ दिवस ब्रह्मांडात वाईट शक्तींनी प्रक्षेपित केलेल्या त्रासदायक लहरी, तसेच आदिशक्तीच्या मारक व चैतन्यमय लहरींचे युद्ध चालू असते. या वेळी ब्रह्मांडातील वातावरण तप्त झालेले असते व दुर्गादेवीच्या शस्त्रांतून तेजाची झळाळी अतिवेगाने सूक्ष्म शक्तींवर हल्ला करत असते, अशी कल्पना आहे.
आई दुर्गेच्या वेगवेगळया रूपाची पुजा

नवरात्रात प्रत्येक दिवसाला आई दुर्गेच्या वेगवेगळया रूपाची पुजा केली जाते. तसेच लाकडी काडयांपासुन बनविलेल्या नव्या टोपलीत माती भरली जाते, त्यात नऊ प्रकारचे धान्य पेरले जातात. या टोपलीत दहा ही दिवस पाणी टाकल्या जाते. दहा दिवसांमधे संपुर्ण टोपली धानाने हिरवीगार झालेली आणि मातीचा घट त्यामधे झाकुन गेलेला असतो.
टोपलीच्या मधोमध मातीचा घट ठेवून त्यात विडयाची पाच पाने ठेवली जातात त्यावर नारळ ठेवल्या जातो. प्रत्येक दिवशी या घटावर फुलांची माळ सोडली जाते. पहिल्या दिवशी अनेक ठिकाणी विड्याच्या पानांची माळ लावण्याची देखील परंपरा आहे. पुजेत पाच प्रकारची फळे ठेवण्यात येतात आणि वर फुलोरा बांधला जातो. गणपतीची, देवीची आणि नवरात्राची आरती म्हंटल्या जाते.
नवरात्रीच्या या उत्सवात नऊ दिवस देवीला वेगवेगळया रंगाच्या साड्या नेसवल्या जातात आणि त्या रंगांप्रमाणे स्त्रिया देखील त्या त्या रंगांच्या साड्या परिधान करतांना दिसतात. नवरात्रातील नववा दिवस हा या उत्सवाचा शेवटचा दिवस असतो, या दिवसाला महानवमी देखील म्हणतात. या दिवशी कुमारिकांचे पुजन केले जाते, नऊ छोटया कुमारिकांना बोलावुन त्यांचे पुजन करण्याची प्रथा आहे. या नऊ कुमारिकांपैकी प्रत्येकीला देवि दुर्गेचे एक रूप मानले जाते. या दिवशी या कन्यांचे पाद्यपुजन केले जाते. मोठ्या आदर आणि सन्मानाने त्यांना घरी आमंत्रीत केले जाते. नंतर त्या कन्यांना जेऊ घातले जाते. नंतर भाविक त्यांना नवे वस्त्र आणि भेटवस्तु देखील देतात.
नवरात्रीच्या या काळात अनेक कुटुंबांमधे जोगवा मागण्याची देखील परंपरा आहे. त्याप्रमाणे घरातील सवाष्ण स्त्री पाच घरी जाऊन जोगवा मागते. त्यामधे कणीक, तांदुळ, गुळ असे जिन्नस असतात. या मिळालेल्या जोगव्यातुनच कुळाचाराच्या दिवशी स्वयंपाक करून देवीला नैवेद्य दाखविण्यात येतो. सार्वजनिक मंडळांमधे मोठ्या मोठ्या मुर्तींची स्थापना करण्यात येते. सुरेख असे देखावे तयार करण्यात येतात. पारंपारीक आणि पुराणकाळातील देखावे आकर्षक असतात आणि भाविकांचे लक्ष वेधणारे देखील असतात. कोल्हापुर, तुळजापुर, माहुर आणि सप्तश्रृंगी या महाराष्ट्रातील साडेतिन शक्तीपिठांवर या दहा दिवसांमधे भाविकांची प्रचंड प्रमाणात गर्दी असते. भाविक या दिवसांमधे देवीचे दर्शन घेणे मोठे पुण्याचे कार्य समजतात.
नवरात्रातील दांडिया आणि गरबाचा खेळ

नवरात्रात रात्री लोक दांडिया आणि गरबा खेळतात. गरबा आरतीच्या आधी आई दुर्गेच्या सन्मानार्थ खेळल्या जातो, आणि दांडिया आरतीच्या नंतर खेळल्या जातो. नवरात्रीच्या दहाव्या दिवशी दसरा साजरा केला जातो. या दिवशी लंकाधीश असुर रावणाचा पुतळा बनवुन त्याचे दहन केले जाते. रामायणानुसार प्रभु रामचंद्रांनी देवी दुर्गेला रावणासोबत युध्द होत असतांना बोलवले होते. नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काल असतो. यामुळे आपल्या नवीन शक्ती, नवा उत्साह, उमेद निर्माण होत असते. सृष्टीतील परिवर्तन हा शक्तीचाच खेळ आहे. ब्रह्मचर्य, संयम, उपासना, यज्ञ केल्याने शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते. स्मरणशक्ती चांगली होवून बौद्धिक विकास होतो. म्हणून नवरात्र हा शारीरिक व आत्मिक शुद्धतेचा काल असल्याचे देखील मानले जाते.
अधिक लेखासाठी येथे क्लिक करा