जुलैमध्ये दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता!

जुलैमध्ये दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता!

पुणे (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर राज्य सरकारने 2020-21 या शैक्षणिक सत्रातील दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. मात्र, अकरावीच्या विविध शाखांमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण विभागाच्या सीईटी परिक्षेला सामोरे जावे लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्याच्या प्रक्रियेचे राज्य मंडळाने वेळापत्रक जाहीर केले असून, त्यानुसार जुलैमध्ये दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

शालेय शिक्षण विभागाकडून दहावीच्या विद्यार्थ्यांचा अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर करण्याबाबत शासन निर्णयाद्वारे मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार नियमित, खासगी आणि पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन शाळास्तरावर करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी निकाल तयार करण्याच्या प्रक्रियेचे वेळापत्रक आणि निकाल तयार करण्याची कार्यपद्धती जाहीर केली असून, राज्य मंडळाकडून मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी 10 जूनला यूट्यूबद्वारे मूल्यमापनाबाबत कार्यशाळा घेतली जाणार आहे. दरम्यान, मूल्यमापन न झालेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन, विषय शिक्षकांनी विषयनिहाय गुणतक्ते वर्गशिक्षकांकडे सादर करणे, वर्ग शिक्षकांनी संकलित निकाल अंतिम करून निकाल शाळा समितीकडे सादर करणे यासाठी 11 जून ते 20 जूनची मुदत आहे.

वर्ग शिक्षकांनी तयार केलेल्या निकालाचे निकाल समितीने परीक्षा आणि नियमन करून ते प्रमाणित करण्यासाठी 12 जून ते 24 जून ही मुदत देण्यात आली आहे. निकाल समितीने प्रमाणित केलेल्या निकालानुसार विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण मुख्याध्यापकांनी मंडळाच्या निकाल प्रणालीमध्ये भरण्यासाठी 21 जून ते 30 जून ही मुदत असणार असून, 25 जून ते 30 जून या कालावधीत निकाल समितीने प्रमाणित केलेले विद्यार्थ्यांचे निकाल आणि अनुषंगिक स्वाक्षरी प्रपत्रे मुख्याध्यापकांनी लाखबंद पाकिटात विभागीय मंडळात जमा करायचे आहेत. दरम्यान, 3 जुलैपासून विभागीय मंडळ आणि राज्य मंडळाच्या स्तरावरील निकालाची कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे जुलैमध्ये राज्य मंडळाकडून अंतिम निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub