आगामी चित्रपटासाठी अक्षयला मिळणार 100 कोटींचे मानधन

आगामी चित्रपटासाठी अक्षयला मिळणार 100 कोटींचे मानधन

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सिने इंडस्ट्रीला मोठा फटका लागला होता, आता मात्र परिस्थिती पूर्वपदावर येत असून, देशात 15 ऑक्टोबरपासून केंद्राने 50 टक्के प्रेक्षक संख्येसह इतर नियम अटी देऊन चित्रपटगृहे खुली केली आहे. दरम्यान, अक्षय कुमार बॉलिवूडचा सर्वाधिक बिझी अभिनेता आहे. यापुढे कदाचित सर्वाधिक महागडा अभिनेता, असेही अक्षयबद्दल म्हणावे लागणार असून, अक्षयने दिग्दर्शक मुदस्सर अजीज यांचा एक कॉमेडी सिनेमा साईन केल्याचे समोर आले आहे. या सिनेमासाठी अक्षयने तब्बल 100 कोटी रूपयांचे मानधन घेतले असल्याचे बोलले जात आहे.

‘बेल बॉटम’ या सिनेमाचे शूटींग सुरु असतानाच अक्षयने दिग्दर्शक मुदस्सर अजीज यांच्या कॉमेडी सिनेमासाठी होकार दिला होता. हा सिनेमा जॅकी व वासू भगनानी प्रोड्यूस करीत असून, या सिनेमाचा प्रॉडक्शन बजेट 35 ते 40 कोटी रूपये आहे. मात्र एकूण बजेट 150 कोटी रूपयांवर पोहोचला आहे. कारण केवळ अक्षय कुमारलाच मानधनापोटी 100 कोटी रूपये फी देण्यात येणार आहे. हा सिनेमा अक्षय केवळ 45 दिवसांत पूर्ण करणार असून, यामुळे चित्रपटात संभाव्य तोट्याची शक्यता कमी आहे. तसेही सॅटेलाईट, डिजिटल आणि म्युझिक राईट्स विकून चित्रपटावर लागलेले अर्धे पैसे वसूल होणार असून, बाकीचे अर्धे पैसे थिएटरमधून निघणार आहेत. 

दरम्यान, मुदस्सर अजीजच्या चित्रपटासोबत अक्षय कुमारला एक सोशल ड्रामा आणि एक्शन थ्रिलर चित्रपटाची देखील ऑफर देण्यात आली असून, सध्या अक्षय कुमारकडे जवळपास एकूण 10 चित्रपट आहेत. ज्यांचे शूटिंग 2021 पर्यंत पूर्ण होईल. सध्या अक्षय यशराज बॅनरचा चित्रपट ‘पृथ्वीराज’मध्ये व्यग्र आहे. दरम्यान, दिग्दर्शक मुदस्सर अजीज यांच्या आगामी चित्रपटाचे शूटींग पुढील वर्षी जुलैच्या जवळपास सुरु होईल आणि ऑगस्टच्या अखेरपर्यंत सिनेमा बनून तयार होईल. यासाठी अक्षयला तब्बल 100 कोटी रूपयांचे मानधन मिळणार असल्याचे बोलले जात आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub