कोरोना रुग्णांच्या मदतीला सरसावला ‘राधे’

कोरोना रुग्णांच्या मदतीला सरसावला ‘राधे’

राधे चित्रपटाची कमाई कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी वापरली जाणार!

मुंबई (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण देशावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट ओढवले असून, अभुतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात परिस्थिती आणखी बिकट होणार असल्याची भीती व्यक्त केली जात असून, अनेक ठिकाणी बेड्स, ऑक्सिजन यांची कमतरता, रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा तसेच कोरोना लसींचा मोठा तुटवडा सध्या जाणवत असून, बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने कोरोनाबाधितांच्या कुटुंबियांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. सलमानचा चित्रपट ‘राधे : योर मोस्ट वाँटेड भाई’ हा लवकरच प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाची कमाई कोरोना संकटात अडकलेल्या सर्व लोकांची मदत करण्यासाठी वापरली जाणार आहे.

देशात कोरोनाचे संकट वाढत आहे. रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने बऱ्याच रूग्णालयांमध्ये वैद्यकिय सुविधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक कोरोना रूग्णांना बेड, ऑक्सिजन आणि औषध वेळेवर मिळत नाही. त्यामुळे अनेकांनी सरकारकडे मदत मागितली आहे. आता बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने कोरोनाबाधितांच्या कुटुंबियांसाठी मदतीचा हात पुढे केला असून, सलमानने आणि झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजने एक मोठी घोषणा केली आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी सांगितले की, देश सध्या अनेक अडचणींचा सामना करत आहे. कोरोना विरोधी लढाईमध्ये आम्ही सहभागी होऊ इच्छित आहे. त्यामुळे आम्ही राधे चित्रपटाची कमाई कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी वापरणार आहोत.

सलमान खान फिल्म्सच्या एका प्रवक्त्याने सांगितले, आम्ही या कामात भाग घेत आहोत या बद्दल मला अभिमान वाटत आहे. आम्हाला आनंद आहे की, कोरोनाच्या या लढाईमध्ये आम्ही आमचे योगदान देऊ शकतो. झी एंटरटेनमेंट एंटरप्राइज आणि सलमान खान फिल्म्स या दोन्ही कंपन्यांनी रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबांनासुद्धा मदत देणार असल्याचे म्हटले आहे. सलमानच्या या निर्णयाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. याआधी सलमानने कोरोनामुळे वडिलांचा मृत्यू झालेल्या कर्नाटकामधील एका 18 वर्षाच्या मुलाची जबाबदारी स्विकारली होती. तसेच सलमान त्याच्या ‘बिइंग ह्यूमन फाउंडेशन’ या संस्थेमार्फत नेहमीच सामाजिक कार्य करत असतो.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub