केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाचे पथक परभणीत

केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाचे पथक परभणीत

परभणी (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण राज्य हे कोरोना महामारीशी झूंज देत असून, राज्यात लसीकरणाला देखील सूरूवात झालेली आहे. त्यातच मात्र आता, परभणी जिल्ह्यात बर्ड फ्लूचा प्रादूर्भाव वाढत आहे. जिल्ह्यातील मुरुंबा गावात बर्ड फ्लूने 800 कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानंतर पेडगाव तालुक्यात तब्बल 700 कोंबड्या बर्ड फ्लूनेच मृत्युमुखी पडल्या. दरम्यान, बर्ड फ्लू संसर्ग व इतर माहिती घेण्यासाठी केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाचे पथक सोमवार दि. 18 जानेवारी रोजी जिल्ह्यात दाखल झाले असून, परभणी तालुक्यातील मुरुंबा येथे भेट देऊन आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीचा आढावा या पथकाने घेतला.

परभणीतील मुरुंबा गावात बर्ड फ्लूने कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचा अहवाल भोपाळ येथील प्रयोगशाळेने दिल्यानंतर, पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या अहवालानंतर संसर्ग प्रतिबंधक उपाययोजना या भागात राबविण्यात आल्या. मुरुंबा परिसरासह सेलू तालुक्यातील कुपटा येथील कोंबड्यांचा मृत्यूही बर्ड फ्लूने झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोन्ही ठिकाणच्या कुक्कुट पक्ष्यांना दयामरण देण्यात आले. त्याचप्रमाणे, या भागातील पक्ष्यांच्या खरेदी-विक्रीला प्रतिबंध घालण्यात आला होता. जिल्हा प्रशासन, तसेच पशुसंवर्धन विभागाने या प्रतिबंधक उपाययोजना केल्या.

जिल्ह्यात संसर्ग झालेल्या ठिकाणांची पाहणी करण्यासाठी व आढावा घेण्यासाठी सोमवार दि. 18 जानेवारी केंद्र शासनाचे 3 सदस्यीय पथक परभणीत दाखल झाले. या पथकात दिल्ली येथील सार्वजनिक आरोग्यसेवा सल्लागार समितीचे डॉ.सुनील खापरडे, औषधशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.रोहितकुमार, विषाणू शास्त्रज्ञ डॉ.मनोहर चौधरी, तसेच औरंगाबाद येथील डॉ.प्रदीप मुरुंबीकर यांचा समावेश आहे. मुरुंबा येथे या पथकाने भेट दिली. त्याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शंकरराव देशमुख, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर सुरवसे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.व्ही.आर. पाटील, जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त डॉ.लोणे, पशुधन विकास अधिकारी डॉ.कीर्ती तांबे, डॉ.प्रकाश सावणे, डॉ.पवन सोळंके आदींची उपस्थिती होती.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub