राम मंदिराला देणगी म्हणून मिळालेले पंधरा हजार चेक बाऊन्स!

राम मंदिराला देणगी म्हणून मिळालेले पंधरा हजार चेक बाऊन्स!

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : राम जन्मभूमीचा निकाल लागल्या दिवसापासून देशभरात उत्सुकता लागून राहिली आहे, ती म्हणजे अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिराची. त्यातच या मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडला आणि ओघाओघाने अनेकांनीच मंदिराच्या निर्माणामध्ये खारीचा वाटा म्हणून काही निधी दान करण्यात सुरुवात केली. मात्र, राम मंदिरासाठी देणगी म्हणून देण्यात आलेले 22 कोटी रुपयांचे तब्बल 15,000 चेक बाऊन्स झाले आहेत. राम मंदिर निर्माणासाठी बनवण्यात आलेल्या श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या ऑडिट रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे.

ऑडिट रिपोर्टमध्ये ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, संबंधित खात्यांमध्ये पैसे नसणे किंवा ओवररायटिंग आणि स्वाक्षरीमध्ये मिसमॅच अशा चुकांमुळे चेक बाऊन्स झाले आहेत. ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांनी सांगितले की, यासंबंधी चर्चा सुरु आहे. शिवाय तांत्रिक अडचणींना दूर करुन पैस ट्रान्सफर करुन घेण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला आहे. मिश्रा यांनी पुढे सांगितले की, ज्यांनी जारी केलेले चेक बाऊन्स झाले आहेत, अशा सर्वांना आपली चूक सुधारण्यासाठी संधी देण्यात येईल.

ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी यांनी सांगितले की, 15 हजार चेक बाऊन्स झाले आहेत, त्यातील जवळपास 2 हजार चेक अयोध्यामधूनच गोळा करण्यात आले आहेत. याशिवाय दूसरे 13000 चेक देशातील विविध कानाकोपऱ्यातून आलेले आहेत. बाऊन्स झालेले चेक आम्ही परत करत आहोत आणि देणगी देणाऱ्यांना आम्ही आवाहन करत आहोत की, त्यांनी नवीन चेक जारी करावेत. असे असले तरी चेक बाऊन्स होण्याची संख्या खूप मोठी आहे.

विश्व हिंदू परिषद आणि त्याच्याशी संबंधित अन्य संघटनांकडून राम मंदिर निर्माणासाठी देणगी गोळा करण्यासाठी अभियान सुरु करण्यात आले होते. हे अभियान 15 जानेवारी ते 17 फेब्रुवारीपर्यंत सुरु होते. या अभियानातून 2 हजार 500 कोटी रुपये देणगी मिळाल्याचे सांगितले जाते. ट्रस्टने यासंबंधी अधिकृत कोणताही आकडा सांगितलेला नाही. राम मंदिर निर्माणसाठी सर्वाधिक देणगी राजस्थान राज्यातून मिळाली असून, ती 515 कोटी रुपये आहे. विश्व हिंदू परिषदेचे नेते चंपत राय यांचे म्हणणे आहे की, जवळपास अडीच एकर जागेवर केवळ मंदिर बनवले जाईल.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub