राज्यात यंदा सरासरीच्या तुलनेत जास्त पावसाची नोंद!

पुणे (प्रतिनिधी) : यंदा वेळेवर आलेल्या मॉन्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असून, राज्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी सुरूच आहे. दरम्यान, देशभरात गेले तीन ते चार महिने समाधानकारक हजेरी लावलेल्या मान्सूनचा परतीचा प्रवास या वर्षीही परतीचा प्रवास लांबला आहे. राज्यात यावर्षी धुवाधार पावसाची नोंद झाली असून, बृहन् मुंबई, मुंबई उपनगरसह पुणे, औरंगाबाद, नगर, सिंधुदुर्ग, धुळे आणि बीड जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत जास्त पावसाची नोंद झाली आहे.
राज्यात मुंबईसह नगर आणि औरंगाबाद जिल्ह्यांना यंदाच्या पावसाळ्यात धुवाधार पाऊस पडला. मराठवाड्यातही पावसाने दमदार हजेरी लावली. या वर्षीचा मॉन्सून केरळमध्ये बरोबर 1 जूनला दाखल झाला. त्याने राजस्थानपर्यंतचा 37 दिवसांचा प्रवास यंदा अवघ्या 25 दिवसांमध्येच पूर्ण केला. महाराष्ट्रात 11 जूनला मॉन्सूनने हजेरी लावली. राज्यात 1 जून ते 29 सप्टेंबर या दरम्यान सरासरीच्या तुलनेत 17 टक्के जास्त पावसाची नोंद झाली होती.
राज्यात यंदा मुंबई, नगर आणि औरंगाबाद जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सर्वाधिक सरी पडल्या. तेथील सरासरीच्या 60 टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद या जिल्ह्यांमध्ये झाली. सुरुवातीच्या दमदार हजेरीनंतर पावसाने जुलैमध्ये दडी मारली. मात्र, ऑगस्टमध्ये महाराष्ट्राला पाण्याच्या संकटातून बाहेर काढले. राज्याचा दुष्काळी भाग समजल्या जाणाऱ्या मराठवाड्यातील जिल्ह्यांवर यंदा मॉन्सून धो-धो पडला. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली.
जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.