शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चा बाबत पोलिसांनीच निर्णय घ्यावा : सुप्रीम कोर्ट

शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चा बाबत पोलिसांनीच निर्णय घ्यावा : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : नव्या कृषी विधेयकांवरुन देशभरात शेतकरी संघटना आक्रमक झालेल्या आहेत. नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर हजारोंच्या संख्येने शेतकरी जमलेले असून, देशाच्या प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारी या दिवशी शेतकरी संघटना कृषी कायद्याविरोधात सुरु असणारे त्यांचे आंदोलन सुरुच ठेवणार आहेत. दरम्यान, दिल्लीत शेतकरी संघटनांच्या प्रस्तावित 26 जानेवारी रोजी होणाऱ्या ट्रॅक्टर मोर्चा विरोधात सुप्रीम कोर्टात दिल्ली पोलिसांकडून एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला असून, याप्रकरणी पुढील सुनावणी 20 जानेवारीला होणार आहे.

सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असून पोलिसांनीच याबाबत निर्णय घ्यावा. तसेच केंद्र सरकारलाही परिस्थिती कशी हाताळावी याचे पूर्ण अधिकार असल्याचे कोर्टाने सांगितले आहे. सुप्रीम कोर्टाने म्हटले की, दिल्लीत कोणाला प्रवेश द्यावा याचे अधिकार सर्वात प्रथम दिल्ली पोलिसांकडे आहेत. दिल्लीमध्ये कोणाला प्रवेश दिला जावा तसेच किती जणांना प्रवेश दिला जावा याचा निर्णय पोलीस घेऊ शकतात. तसेच आपण मध्यस्थी करु शकत नसल्याचे यावेळी सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे.

सुप्रीम कोर्टाने केंद्राला यावेळी सांगितले की, तुम्ही काय करावे हे आम्ही तुम्हाला सांगणार नाही. आम्ही यावर 20 जानेवारीला सुनावणी करु. पोलीस कायद्यांतर्गत तुम्हाला कोणते अधिकार आहेत हे आम्ही सांगणे अपेक्षित आहे का? तुमच्याकडे अधिकार आहेत हे कोर्टाने सांगण्याची काय गरज?. दरम्यान, नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणारे शेतकरी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहेत. 26 जानेवारीला काढण्यात येणारा ट्रॅक्टर मोर्चा कोणत्याही परिस्थितीत रद्द करणार नाही अशी भूमिका शेतकरी संघटनांनी घेतली आहे.

प्रजासत्ताकदिनी दिल्लीत ट्रॅक्टर मोर्चा काढण्याच्या निर्णयावर आपण कायम असल्याचे केंद्राच्या कृषी कायद्यांविरुद्ध आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी रविवार दि. 17 जानेवारी रोजी स्पष्ट केले आहे. प्रजासत्ताक दिन संचलनात मोर्चाचा अडथळा येणार नाही, असे देखील सांगितण्यात आले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्च्यामुळे प्रजासत्ताक दिनानिमित्त होणारे मेळावे आणि समारंभांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. शेतकऱ्यांना मोर्चा काढण्यास किंवा अन्य कुठल्याही प्रकारचे आंदोलन करण्यास मनाई करावी, अशी याचिका केंद्र सरकारने दिल्ली पोलिसांमार्फत दाखल केली. याचिकेवरील पुढील सुनावणी 20 जानेवारीला होणार आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub