सीरमने तयार केलेली कोरोना लस 70 टक्के परिणामकारक

सीरमने तयार केलेली कोरोना लस 70 टक्के परिणामकारक

पुणे (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण जग हे कोरोना महामारीशी झूंज देत आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये उद्रेक झाल्यानंतर कोरोनाचे विषाणू जगभरात पोहोचले. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वच देशातील वैज्ञानिक लस तयार करण्याचे महत्त्वाचे काम करत आहे. दरम्यान, उत्तर भारतात दिवाळीनंतर आणि थंडीमुळे कोरोनाच्या संसर्गाचा वेग वाढल्यामुळे पुन्हा नाइट कर्फ्यू लावण्याची वेळ आली आहे. अशातच मॉडर्ना कंपनीनंतर आता कोरोना लशीच्या बाबतीत एक मोठी आणि आनंद देणारी बातमी समोर आली असून, पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने ऑक्सफोर्डसोबत तयार केलेली कोरोनाची लस 70.4 टक्के परिणामकारक असल्याचे सांगण्यात आले आहे.

देशात कोरोना व्हायरस विरोधात लस निर्मिती निर्णायक टप्प्यावर आली असून, फेज 3 च्या चाचणीत ऑक्सफोर्ड अ‍ॅस्ट्रॅजेनेका कोविड लस 70 टक्क्यांपेक्षा जास्त प्रभावी होती. सोमवार दि. नोव्‍हेंबर रोजी जाहीर केलेल्या अंतिम विश्लेषणात या लशीची कार्यक्षमता 70.4 टक्के प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. पहिला डोस दिल्यानंतर त्याचे परिणाम 90 टक्क्यांपर्यंत दिसून आले होते. मात्र दुसऱ्या डोसनंतर 62 टक्के परिणामकारकता दिसल्याचे सांगितले जात आहे. दोन्ही डोसचे एकत्र विश्लेषण केल्यास ही लस 70 टक्के परिणामकारक असल्याचे समोर आले आहे.

सर्व विश्लेषणातून ही लस कोरोनाचा संसर्ग कमी करू शकते त्यासाठी ही प्रभावी असल्याचे प्राथमिक माहितीमध्ये समोर आले आहे. तर दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे चाचणीदरम्यान ही लस सुरक्षित असल्याचा कंपनीने दावा केला आहे. मानवी चाचणीदरम्यान कोणत्याही स्वयंसेवकाला रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली नाही. भारतासाठी ही गोष्ट खूप चांगली असल्याचे देखील सीरम कंपनीकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, कोरोनाव्हायरसला 94.5 टक्के नष्ट करण्याचा दावा करणारी मॉर्डना लस लवकरच डोस उपलब्ध करणार आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub