सणासुदीसाठी सुरू केलेल्या विशेष रेल्वे ऐन दिवाळीतच होणार बंद

सणासुदीसाठी सुरू केलेल्या विशेष रेल्वे ऐन दिवाळीतच होणार बंद

परभणी (प्रतिनिधी) : कोरोना वायरसने संपूर्ण राज्याला जनु विळखाच घातला आहे. जीवघेण्या कोरोना वायरसपुढे संपुर्ण राज्य हतबल झाले असून कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ते सर्व उपाय योजना केल्या जात आहेत. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमिवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून सुट दिली जात असून, भारतीय रेल्वेने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर विशेष रेल्वे सुरु केली होती. मात्र दक्षिण मध्य रेल्वेने मोठा गाजावाजा करीत सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या 4 विशेष रेल्वे ऐन दिवाळी सणातच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

देशात मागील सहा महिन्यांपासून ठप्प असलेली रेल्वे सेवा दसरा व दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य रेल्वे विभागाने सुरू केली होती. या विशेष रेल्वे सुरू करताना रेल्वे विभागाने प्रवाशांना आरक्षण करणे सक्तीचे केले होते. त्यामुळे सर्वच गाड्यांना आरक्षणाशिवाय प्रवास करणे शक्य नसल्याने प्रवाशांनीही सणाच्या पार्श्वभूमीवर आरक्षण करीत प्रवास करणे पसंत केले होते. परंतु खास दिवाळीसाठी सुरू करण्यात आलेल्या रेल्वे गाड्यांना प्रवाशांचा प्रतिसाद कमी मिळत असून व्यवसाय कमी होत असल्याचे कारण पुढे करीत दक्षिण मध्य रेल्वेने 4 विशेष रेल्वे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

रेल्वे विभागाने काही ठराविक विशेष रेल्वेही सुरू केल्या. ज्यात दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड पनवेल नांदेड, धर्माबाद नांदेड धर्माबाद, काचिगुडा नरखेड काचिगुडा, काचिगुडा अकोला काचिगुडा या रेल्वे 23 ते 28 ऑक्टोबरच्या दरम्यान मोठा गाजावाजा करत सुरू केल्या. या सर्व रेल्वेतून प्रवास करण्यासाठी आरक्षण गरजेचेच असल्याची अट घातली. मात्र या रेल्वे गाड्यांना प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याचे सांगून सर्व रेल्वे जाहीर केलेल्या तारखेच्या आधीच बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आनंदावर विरजण आले आहे.

दरम्यान, दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड पनवेल नांदेड (क्र.07614 व 13) ही रेल्वे गाडी 23 व 24 ऑ्क्टोबरला सुरू केली होती. ती 30 नोव्हेंबरपर्यंत चालणार असल्याचे म्हटले होते. मात्र, ही रेल्वे नांदेड येथून 23 व पनवेल येथून 24 नोव्हेंबरपासून रद्द करण्यात येणार आहे. तसेच धर्माबाद मनमाड धर्माबाद (क्र. 07688 व 87) ही रेल्वे 24 ऑक्टोबर रोजी सुरू केली होती. ती पण 30 नोव्हेंबरपर्यंत धावेल असे म्हटले होते. आता मात्र, 15 नोव्हेंबर ऐन दिवाळीमध्येच रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला असून, दिवाळी सण समोर ठेवून सुरू केलेली ही रेल्वे दिवाळीच्या दिवशीच बंद करण्यात येणार आहे.

याचबरोबर तिरूपती कोल्हापूर तिरूपती (क्र. 07415 व 16) ही रेल्वे 28 व 30 ऑक्टोबरपासून सुरू केल्या होत्या. मात्र, तिरूपतीहून गुरुवार दि.12 नोव्हेंबर रोजी तर कोल्हापूर येथून धावणारी 14 नोव्हेंबर रोजी शेवटचा प्रवास करेल असे म्हटले आहे. या शिवाय काचिगुडा नरखेड काचिगुडा (क्र.07641 व 42) विशेष रेल्वे काचिगुडा येथून 14 नोव्हेंबरला तर नरखेड येथून 15 नोव्हेंबरला शेवटचा प्रवास करणार आहे. तर काचिगुडा अकोला काचिगुडा (क्र.07639 व 40) ही विशेष रेल्वेही 16 नोव्हेंबरला काचिगुडा येथून तर अकोला येथून 17 नोव्हेंबरला शेवटचा प्रवास करेल, असे दक्षिण मध्य रेल्वेने जाहीर केले आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub