खासदारांना आता संसद भवनात अनुदानित जेवण मिळणार नाही

खासदारांना आता संसद भवनात अनुदानित जेवण मिळणार नाही

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण देश हे कोरोना महामारीशी झूंज देत असून, सध्यस्थितीत देशात लसीकरणाला देखील सूरूवात झाली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात लोकशाहीच्या नव्या मंदिराची उभारणी सुरु होत असून, दिल्लीत या कामाची तयारी सुरु झालेली आहे. मात्र, सर्वोच्च न्यायलयाने नव्या संसद भवनाच्या निर्मितीस तात्पूर्ती स्थगिती दिली आहे. त्यातच आता खासदारांना संसद भवन संकुलाच्या कॅन्टीनमध्ये अनुदानित जेवण मिळणार नसल्याची माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली आहे.

ओम बिर्ला यांनी म्हटले की, खासदारांना आणि इतरांना संसदेतील कॅन्टीनच्या जेवणावर दिले जाणारे अनुदान बंद करण्यात आले आहे. दरम्यान, भारतीय पर्यटन विकास महामंडळ आता संसदेची कॅन्टीन चालवणार आहे. याआधी ही जबाबदारी उत्तर रेल्वेकडे होती. याआधी संसदेच्या कॅन्टीनमध्ये जेवणांची प्लेट अवघ्या 35 रुपयांना मिळत होती. मात्र ती आता रद्द करण्यात आल्यामुळे लोकसभा सचिवालयाची दरवर्षी 8 कोटी रुपयांची बचत होणार असल्याचे बोलले जात आहे.

ओम बिर्ला पुढे म्हणाले की, 2 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात राज्यसभेचं कामकाज सकाळी 9 वाजेपासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत होणार आहे. लोकसभेचे कामकाज संध्याकाळी 4 वाजेपासून ते 8 वाजेपर्यंत चालणार आहे. संसद अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सर्व खासदारांना कोरोनाची चाचणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खासदार निवासस्थानाजवळ त्यांच्या आरटी-पीसीआरची कोविड-19 चाचणी घेण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. 27 आणि 28 जानेवारी रोजी संसद आवारात आरटी-पीसीआर तपासणी केली जाईल. खासदारांच्या कुटुंबीय तथा कर्मचार्‍यांची आरटी-पीसीआर तपासणीची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub