कोरोना लस पुरवणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटला आग

कोरोना लस पुरवणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटला आग

पुणे (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण राज्य हे कोरोना महामारीशी झूंज देत आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये उद्रेक झाल्यानंतर कोरोनाचे विषाणू सर्वोत्र पोहोचले, त्याचा फटका हा संपूर्ण महाराष्ट्राला लागला असून, कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ते सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. त्यातच 9 जानेवारी रोजी भंडारा जिल्हा रुग्णालयात आग लागल्याची घटना घडली असून, या घटनेत 10 बालकांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच आता देशभरात कोरोना लस पुरवणाऱ्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागली आहे.

कोरोनाच्या संसर्गामुळे मागील एक वर्षापासून देशातील जनता धास्तावलेली होती. आता मात्र, संपूर्ण देशात कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झालेली आहे. अशातच मात्र, देशभरात कोरोना लस पुरवणाऱ्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागली आहे. इन्स्टिट्यूटमधील बी.सी.जी. लस बनवण्याच्या इमारतीला आग लागलेली असून, सीरम इन्स्टिट्यूटचा हा मांजरी भागातील नवीन प्लांट आहे. अग्निशामक दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून, आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

दरम्यान, इमारतीत 4 जण अडकले होते. त्यापैकी तीन जणांना बाहेर काढण्यात यश आले असून, एका व्यक्तीचा शोध सुरू आहे. आगीचा कोणताही परिणाम कोव्हीशील्ड वॅक्सीन प्रोडक्शनवर होणार नाही, अशी माहिती सीरम इन्स्टीट्यूटने दिली. कोविशिल्ड लसीचे उत्पादन सुरू असलेली इमारत सुरक्षित असल्याची माहिती आहे. कारण आग ही बी.सी.जी. लस बनवण्याच्या इमारतीला लागली आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पाहायला मिळाले.

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही व्हॅक्सीन बनवणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. कोरोनावरील लसीची निर्मिती इथे मे महिन्यापासून सुरू आहे. सीरम इन्स्टिट्यूटकडून पोलिओ, डायरीया, हिपॅटायटस, स्वाईन फ्लू अशा अनेक आजारांवरील लसींची निर्मिती केली जाते. आज जगभरात वेगवेगळ्या आजारांवरती ज्या लसींचा उपयोग केला जातो त्यापैकी 65 टक्के लसी या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार होतात. मात्र, याच इन्स्टिट्यूटमधील बी.सी.जी. लस बनवण्याच्या इमारतीला आग लागलेली असून, आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub