राज्यातील सर्व दुकाने आज पासून सूरू राहणार : व्यापारी संघटना

राज्यातील सर्व दुकाने आज पासून सूरू राहणार : व्यापारी संघटना

मुंबई (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण राज्यात कोरोनाच्या संक्रमणावर मात करण्यासाठी लसीकरणाला सुरुवात झालेली आहे. असे असले तरी मात्र, पुन्हा एकदा राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमिवर, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात 30 एप्रिल पर्यंत निर्बंध लागू केले असून, विकेंड लॉकडाऊनची देखील अमलबजावणी करण्यात येत आहे. दरम्यान, जीवनावश्क वस्तू वगळता अन्य दुकाने 30 तारखेपर्यंत बंद ठेवण्याचा राज्य शासनाचा आदेश असला तरी राज्यातील व्यापारी सोमवार दि. 12 एप्रिल पासून सर्व दुकाने सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उघडणार असल्याचे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीजने जाहीर केले आहे.

राज्यातील कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठीच सरकारने सोमवार दि. 5 एप्रिल पासून कठोर निर्बंध लागू केले आहेत. जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य दुकाने 30 तारखेपर्यंत बंद ठेवण्याच्या आदेशावरून व्यापारी वर्गात संतप्त प्रतिक्रिया उमटली. राज्यात ठिकठिकाणी व्यापारी रस्त्यावर आले. तर सोमवार दि. 12 एप्रिल पासून सर्व दुकाने सुरू करण्याचा इशारा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स या संघटनेने दिला असून, भाजपने व्यापारी वर्गाला पाठबळ देत त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. यामुळे राज्य सरकार विरुद्ध व्यापारी असा संघर्ष होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

कोरोनाची साखळी तोडण्याकरिता राज्यातील जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य सर्व प्रकारची दुकाने 30 तारखेपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश राज्य सरकारने जारी केला आहे. या विरोधात व्यापारी रस्त्यावर उतरले. ठिकठिकाणी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी व्यापाऱ्यांना पाठबळ दिले. शुक्रवार दि. 9 एप्रिल पासून सर्व दुकाने उघडण्याचा इशारा व्यापारी संघटनेने दिला होता. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर सोमवारपर्यंत दुकाने उघडण्याचे व्यापाऱ्यांनी टाळले होते. लॉकडाऊन बाबत सरकारचा अद्याप काही निर्णय झालेला नाही.

राज्यात एक किंवा दोन आठवड्यांची टाळेबंदी लागू होऊ शकते. यामुळे सर्वसामान्य जनतेला जीवनावश्यक वस्तूंप्रमाणेच अन्य वस्तूंची खरेदी करता यावी म्हणून सोमवार दि. 12 एप्रिल पासून सकाळी 10 ते सायंकळी 5 वाजेपर्यंत सर्व प्रकारची दुकाने उघडी ठेवली जातील, अशी माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्टीजचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिली. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठीच्या सर्व निकषांचे कडकपणे पालन करून आपले व्यापार सुरू करणार असल्याने जिल्हा प्रशासनाने राज्यात सर्वत्र व्यापाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहनही संघटनेच्या वतीने करण्यात आलेले आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub