विनामास्क फिरणाऱ्यास दंड ठोठावणाऱ्या पोलिसावर हल्ला!

विनामास्क फिरणाऱ्यास दंड ठोठावणाऱ्या पोलिसावर हल्ला!

नांदेड (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण राज्य हे कोरोना महामारीशी झूंज देत असून, कोरोनाच्या संक्रमणावर मात करण्यासाठी लसीकरणाला देखील सुरुवात झालेली आहे. असे असले तरी मात्र, पुन्हा एकदा राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमिवर, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात 30 एप्रिल पर्यंत कडक निर्बंध व विकेंड लॉकडाऊन केलेले आहे. मात्र, लॉकडाऊन दरम्यान नांदेड जिल्ह्यात विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तीला दंड लावल्यावरून पोलिसावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात पोलीस कर्मचारी जखमी झाला असून, त्याच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर हल्लेखोर व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

राज्यात मार्च महिन्यापासून कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असून, मृत्यूचे प्रमाण देखील वाढल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून योग्य ते सर्व उपाययोजना करण्यात येत असून, राज्यात 30 एप्रिल पर्यंत कडक निर्बंध व विकेंड लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. या वीकेंड लॉक डाऊन दरम्यान नागरिकांनी बाहेर फिरू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तर विनाकारण व विनामास्क बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना दंड ही ठोठावण्याची कारवाई स्थानिक प्रशासनाकडून केली जात आहे.

दरम्यान, नांदेड व परभणी सीमेवर चेक पोस्टवर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने विनामास्क फिरणाऱ्या दुचाकी चालकांविरूद्ध कारवाई करत दंड ठोठावला. यावेळी एका दुचाकी चालकाने दगड फेकून मारल्याने एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. प्रभाकर कच्छवे असे पोलीस कॉन्स्टेबलचे नाव असून, ते चुडावा पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. प्रभाकर कच्छवे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. गंभीर जखमी अवस्थेतील कच्छवे यांच्यावर नांदेड येथील एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असून, आरोपी दुचाकी चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub