मोहम्मद सिराजपुढे ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजांनी टेकले गुडघे!

मोहम्मद सिराजपुढे ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजांनी टेकले गुडघे!

ऑस्ट्रेलिया : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका सूरू असून, 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ 1-1 अश्या बरोबरीत आहेत. सध्या गाबा येथे ब्रिस्बेनच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये चौथा कसोटी सामना सुरु आहे. मालिकेतील हा अखेरचा आणि निर्णायक कसोटी सामना आहे. मालिका जिंकण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया दोघांना या कसोटीत विजय आवश्यक आहे. दरम्यान, चौथ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 294 धावांवर आटोपला असून, ऑस्ट्रेलियाच्या शेपटाला गुंडाळण्यात मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांनी मोलाचा वाटा उचलला आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजने बॉर्डर-गावसकर चषकातील अखेरच्या कसोटी सामन्यात प्रभावी गोलंदाजी केली. भेदक मारा करणाऱ्या सिराजपुढे ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजांनी गुडघे टेकले आहेत. ब्रिस्बेन कसोटी सामन्यात मोहम्मद सिराजने पाच विकेट घेतल्या असून, ब्रिस्बेनच्या मैदानावर तब्बल 2003 नंतर भारतीय गोलंदाजाने पाच विकेट घेण्याचा कारनामा केला आहे. चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात सिराजने आघाडीच्या तीन आणि तळाच्या दोन फलंदाजांना बाद केले असून, या कसोटी सामन्यात सिराजने एकूण सहा बळी घेतले आहेत.

दरम्यान, पहिल्या डावांत मिळालेल्या 33 धावांच्या आघाडीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने भारताला विजयसाठी 328 धावांचे आव्हान दिले. स्टीव्ह स्मिथचे अर्धशतक आणि इतर फलंदाजांच्या छोटेखानी खेळी यांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने तीनशे नजीक मजल मारली. ऑस्ट्रेलियाच्या शेपटाला गुंडाळण्यात मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांनी मोलाचा वाटा उचलला. डावात शार्दुलने चार तर सिराजने पाच बळी टिपले. त्यामुळे या दोघांचे कौतुक करण्यात आलेच. पण त्याचसोबत कर्णधार अजिंक्य रहाणेचा मोठेपणा देखील या सामन्यात दिसून आला.

मोहम्मद सिराजने चांगली गोलंदाजी केली. त्याने 20 षटके टाकली. त्यात त्याने 73 धावांमध्ये 5 बळी मिळवले. मार्नस लाबूशेन, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, मिचेल स्टार्क आणि जोश हेजलवूड असे पाच बळी त्याने टिपले. ऑस्ट्रेलियाचा शेवटचा गडी हेजलवूड बाद झाल्यावर सारे जण पॅव्हेलियनकडे जाऊ लागले. त्यावेळी कर्णधार रहाणेने मनाचा मोठेपणा दाखवत स्वत: पंचांशी संवाद साधला. सिराजने प्रथमच एका डावात पाच बळी मिळवण्याची किमया साधली. त्यामुळे अजिंक्यने तो चेंडू पंचांकडून मागून सिराजला दिला. अजिंक्यच्या या कृतीची सर्वत्र स्तुती करण्यात आली.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub