ग्रामीण भागात लसीकरणासाठी जनजागृती आवश्यक!

ग्रामीण भागात लसीकरणासाठी जनजागृती आवश्यक!

परभणी (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाच्या संक्रमणावर मात करण्यासाठी लसीकरणाला सुरुवात झालेली आहे. असे असले तरी मात्र, पुन्हा एकदा कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बेड्स, ऑक्सिजन यांची कमतरता, कोरोना लसींचा तुटवडा तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा सध्या जाणवत आहे. दरम्यान, सध्या संपूर्ण राज्यासह जिल्ह्यात लसीकरण सुरु आहे. परंतू ग्रामीण भागात अद्यापही या लसी बाबत संभ्रामावस्था निर्माण झाली असून, ग्रामीण भागातील रहिवाश्यांमधील ही संभ्रावस्था दुर करण्यासाठी प्रयत्न करणे गरजे आहे.

कोरोनाच्या संसर्गामुळे संपूर्ण मानवजाती सध्या त्रासलेली आहे. अश्या परिस्थितीमध्ये जीवन जगत असतांना कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या दोन लस भारतीय शास्त्रज्ञांनी विकसित केल्या आहेत. सध्या त्यांचे लसीकरण देखील सुरु झालेले असून, 45 वर्ष वय पूर्ण असणाऱ्या नागरीकांना ही लस दिली जात आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद प्रशासन व आरोग्य विभाग लसीकरणाची जोरदार जनजागृती करत असल्याचे दिसत आहे. असे असले तरी ग्रामीण भागातील रहिवाश्यांनी अद्यापही या लसीकरणाकडे पाठ फिरविल्याचे दिसत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रावर लसीकरणासाठी तुरळक गर्दी दिसून येत आहे.

लसीकरणासंदर्भात जिल्हा परिषद आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्यावतीने लोकांना लसीकरणाला येण्याचे आवाहन केले जात आहे. असे असले तरी काही अफवामुळे ग्रामीण भागातील अशिक्षित व जुन्या विचारांचे लोक लसीकरणासाठी येत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे लसीकरण केंद्र दिवसभर ओस पडल्याचे चित्र आहे. दरम्यान, अनेक सामाजिक संस्था या समाजहितासाठी कार्यरत असतात. अश्या संस्थाच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती केली जाऊ शकते. कोरोनाच्या नियमांचे पालन करून व प्रशासनाची परवानगी घेवून अश्या सामाजिक संस्था पुढे आल्या तर ग्रामीण भागातील लसीकरणाच्या कामाला वेग येईल. याचा सकारात्मक परिणाम म्हणून गाव कोरोनाची साखळी तोडण्यात यशस्वी होईल.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub