भंडारा आग प्रकरणी दुर्लक्ष करणाऱ्यांना शिक्षा होईल : राजेश टोपे

भंडारा आग प्रकरणी दुर्लक्ष करणाऱ्यांना शिक्षा होईल : राजेश टोपे

मुंबई (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण राज्य हे कोरोना महामारीशी झूंज देत आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये उद्रेक झाल्यानंतर कोरोनाचे विषाणू सर्वोत्र पोहोचले, त्याचा फटका हा संपूर्ण महाराष्ट्राला लागला असून, कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ते सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. त्यातच 9 जानेवारी रोजी भंडारा जिल्हा रुग्णालयात आग लागल्याची घटना घडली असून, या घटनेत 10 बालकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्याबाबत आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, भंडारा उपजिल्हा रुग्णालयातील आगीचा रिपोर्ट बुधवारी येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गरज पडल्यास कॅबिनेटच्याही निदर्शनास हा रिपोर्ट नक्की आणून देऊ. भंडारा उपजिल्हा रुग्णालय जळीतप्रकरणाचा रिपोर्ट अजून आमच्या विभागाचे सचिव आणि आयुक्त यांच्यापर्यंत आलेला नाही. मात्र तो बुधवार दि. 20 जानेवारी रोजी येईल. या रिपोर्टचा अभ्यास आणि चर्चा आमच्या विभाग स्तरावर केली जाईल. त्यानंतर रिपोर्टमध्ये असलेल्या गोष्टींच्या अनुषंगाने कारवाई केली जाईल, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.  

भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला काही दिवसांपूर्वी अचानक आग लागली. मध्यरात्री सारेच झोपेत असताना दहा नवजात बालकांवर काळाने घाला घातला. तीन बालकांचा आगीमुळे तर सात बालकांचा धुराने गुदमरून मृत्यू झाला. या घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिले होते, आता या घटनेचा रिपोर्ट येणार असून, रिपोर्टमध्ये असलेल्या गोष्टींच्या अनुषंगाने कारवाई केली जाईल आणि या प्रकरणी दुर्लक्ष करणार्‍यांना शिक्षा होईल यात शंका नाही. मात्र ही सगळी व्यवस्था दुरुस्त करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, असे आश्वासन टोपे यांनी दिले.

भंडारा जिल्हा रूग्णालयातील घटनेनंतर राजेश टोपे यांनी संवेदना व्यक्त केल्या होत्या. भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूची घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. शनिवारी मध्यरात्री ही दु्र्दैवी घटना भंडाऱ्यातील जिल्हा रूग्णालयात घडली. मृत बालकांच्या कुटुबियांच्या दु:खात सहभागी असल्याची भावना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली होती. तसेच, या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या बालकांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपये देण्यात येणार असल्याची माहितीही टोपे यांनी दिली होती.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub