परभणीत मिरवणुकीशिवाय भिमजयंती साजरी!

परभणीत मिरवणुकीशिवाय भिमजयंती साजरी!

परभणी (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण राज्यावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट ओढवले असून, अभुतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात परिस्थिती आणखी बिकट होणार असल्याची भीती व्यक्त केली जात असून, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण राज्यात 15 दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. दरम्यान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्य परभणीकरांनी बुधवार दि. 14 एप्रिल रोजी कोरोनाचे नियम पाळत अभिवादन केले. प्रशासनाने केलेल्या आवाहनाला साथ देत जिल्ह्यात यंदाही जयंतीची मिरवणुक काढण्यात आली नाही.

परभणी जिल्ह्यात दरवर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. परंतू गेल्या वर्षीपासून कोरोना विषाणु संसर्गामुळे जयंती मिरवणुकीवर काही प्रमाणात निर्बंध आले होते. असे असतांनाही थोडाही उत्साह कमी होऊ न देता विविध जयंती मंडळांनी त्यांच्या परीने समाजोपयोगी उपक्रम राबवून जयंती साजरी केली. सकाळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, आमदार सुरेश वरपुडकर, महापौर अनिता सोनकांबळे, जेष्ठे नेते डी. एन. दाभाडे, विजय वाकोडे, युवानेते सिध्दार्थ हत्तीअंबिरे, डॉ. सिध्दार्थ भालेराव, आकाश लहाने, रविंद्र सोनकांबळे, प्रा. अरुणकुमार लेमाडे यांच्या सह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.

यावेळी पंचशिल ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर उपस्थित नागरीकांनी ध्वजाला मानवंदना दिली. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, आमदार सुरेश वरपुडकर, महापौर अनिता सोनकांबळे यांनी सर्व नागरीकांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, राज्यात 15 दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली असल्यामुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीवर कोरोनाचे सावट दिसून आले. प्रशासनाने केलेल्या आवाहनाला साथ देत जिल्ह्यात यंदाही जयंतीची मिरवणुक न काढता, उलट बाबासाहेबांनी घालून दिलेल्या शिकवणीवर चालत अनेक सामाजोपयोगी उपक्रम राबवून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub