बॉलिवूडची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे ‘पुन्हा लॉकडाऊन नको’ची मागणी!

बॉलिवूडची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे ‘पुन्हा लॉकडाऊन नको’ची मागणी!

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनामुळे सिने इंडस्ट्रीला मोठा फटका लागला होता, आता मात्र परिस्थिती पूर्वपदावर येत असून, चित्रपटगृहे खुली करण्यात आलेली आहे. अलिकडेच अनेक सिनेमे हे चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आले असून, या चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद देखील मिळाला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी सोशल मीडियाद्वारे राज्यातील जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर येत्या एक-दोन दिवसात पुन्हा लॉकडाऊन लावण्याचा इशारा दिला आहे. आता त्यावर फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून पुन्हा लॉकडाऊन न लावण्याची विनंती केली आहे.

बॉलिवूडच्या कलाकारांची संघटना असलेल्या फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजच्या वतीने शुक्रवारी एक पत्र लिहून लॉकडाऊन न लावण्याची विनंती केली आहे. या पत्रात सांगितले आहे की, गेल्या वेळच्या लॉकडाऊनमुळे फिल्म इन्डस्ट्रीला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. या क्षेत्रातले लाखो कामगारांवर तसेच कलाकारांना बेरोजगारीच्या प्रश्नाला सामोरे जावे लागले आहे. आता पुन्हा जर लॉकडाऊन लावण्यात आले तर या क्षेत्रातल्या सर्वानाच मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे तसेच फिल्म इन्डस्ट्रीवर मोठे संकट येईल, असे देखील या पत्रात सांगण्यात आले आहे.

गेल्या वेळच्या कोरोनाच्या काळात अनेक मोठ्या निर्मात्यांनी आणि कलाकारांनी बेरोजगारीचा सामना करणाऱ्या कामगारांना आर्थिक रुपात मदत केली आहे. त्यामुळे अनेकांना या काळात आधार मिळाला होता. आता यावेळी ते निर्माते आणि कलाकार या परिस्थितीत नाहीत की ते कुणाला आर्थिक मदत करू शकतील. त्यामुळे या वेळी पुन्हा लॉकडाऊन लागला तर परिस्थिती बिघडण्याची शक्यता आहे, असे मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज या संघटनेने म्हटले आहे.

गेल्या वेळच्या लॉकडाऊनमध्ये ज्यांनी आपली नोकरी आणि काम गमावले त्यांना अजूनही काम मिळाले नाही. त्यामुळे आता ज्यांना काम मिळाले आहे, त्यांनाही आपल्या रोजगाराला गमवावे लागेल असे देखील या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शुक्रवार दि. 2 एप्रिल रोजी तब्बल 48 हजार कोरोनाबाधितांची नोंद झाली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यात तर कोरोना रुग्ण संख्येचा विस्फोट झाला आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub