संचारबंदीचे उल्लंघन करणे भविष्यात अडचणीचे ठरणार!

संचारबंदीचे उल्लंघन करणे भविष्यात अडचणीचे ठरणार!

परभणी (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण राज्यावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट ओढवले असून, अभुतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात परिस्थिती आणखी बिकट होणार असल्याची भीती व्यक्त केली जात असून, राज्यात संचारबंदी करण्यात आली आहे. मात्र, दरम्यानच्या काळात संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या असून, या संचारबंदी काळात आपण जर विनाकारण घराबाहेर पडले असाल आणि आपल्यावर गुन्हा दाखल झाला असेल तर भविष्यात पासपोर्ट आणि सरकारी नोकरीत हे गुन्हे अडचणीचे ठरणार अशी शक्यता आहे.

संचारबंदीचे उल्लंघन करणे कलम 188, साथरोगाचा प्रसार करून इतरांचा जीव धोक्यात घालणे कलम 269 आणि कलम 270 नुसार जर आपल्यावर गुन्हे दाखल झाले असतील, तर हे गुन्हे गंभीर स्वरूपाचे असून, त्याचे गंभीर परिणामही नागरिकांना भोगावे लागू शकतात. शासनाने ठरवले तरी हे गुन्हे सहजासहजी परत घेतले जाऊ शकत नाहीत. या गुन्ह्यांमुळे आपणास पासपोर्ट मिळवताना अडचणी येण्याची शक्यता तसेच व्हिसा देखील नाकारला जाऊ शकतो. तर सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही अडचण येवू शकते. या गुन्ह्यांमुळे खासगी बँकेत नोकरी मिळवताना अडचण निर्माण होवू शकते, शिवाय काही खाजगी कंपन्या देखील आता पोलिसांचे क्लिअरन्स मागतात त्यातही अडचण येवू शकते.

महाराष्ट्रात गतवर्षी कोविड कालावधीत लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी राज्यात 2 लाख 70 हजार नागरिकांवर पोलिसांनी नोंदवलेले कलम 188 चे सर्व गुन्हे मागे घेण्याची घोषणा तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली होती. त्यांच्या घोषणेनंतर कोणतेही आदेश गृहमंत्रालयांकडून पोलीस प्रशासनाला प्राप्त झाले नाहीत. परिणामी हे गुन्हे मागे घेतले जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, राज्यभरात भारतीय दंड विधान कलम 188 अंतर्गत सुमारे 2 लाख 70 हजार गुन्हे दाखल करण्यात आले होते. याचबरोबर 1 हजार 347 वाहन मालकांवर नियमांचा भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले होते.

लॉकडाउन काळात नियम मोडणाऱ्या नागरिकांना 28 कोटी 40 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. याचबरोबर 37 हजार 42 जणांना अटक करण्यात आली होती. तसेच, 96 हजार 340 वाहने जप्त करण्यात आली होती. लॉकडाऊन काळात पोलिसांवर हल्ला करण्याची 364 प्रकरणे घडली होती. या प्रकरणी 895 जणांना अटक झाली असून, पुढील न्यायालयीन कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे आपल्यावर जर असे गुन्हे दाखल झाले तर आयुष्यभर मनस्ताप करावा लागेल. जरी शासनाने ठरवले हे गुन्हे मागे घ्यायचे तरी हे गुन्हे मागे घ्यायचे की नाही याचा सर्वस्वी अधिकार न्यायालयाला आहे. त्यामुळे या गुन्ह्याला गंभीरतेने घ्या घराबाहेर पडू नका.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub