पुढे काय परिस्थिती निर्माण होईल हे आताच सांगता येणार नाही : नवाब मलिक

पुढे काय परिस्थिती निर्माण होईल हे आताच सांगता येणार नाही : नवाब मलिक

मुंबई (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमिवर, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात 30 एप्रिल पर्यंत निर्बंध लागू केले असून, विकेंड लॉकडाऊनची देखील अमलबजावणी करण्यात येत आहे. दरम्यान, राज्यावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट ओढवले असून, अभुतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात परिस्थिती आणखी बिकट होणार असल्याची भीती व्यक्त केली जात असून, राज्य सरकार लॉकडाऊनच्या तयारीत आहे. सध्याच्या परिस्थितीवर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी भाष्य केले आहे.

नवाब मलिक यांनी राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि राज्य सरकारकडून टाकल्या जाणाऱ्या पावलांची माहिती देत म्हटले आहे की, राज्यात पुढे काय परिस्थिती निर्माण होईल हे आताच सांगता येत नाही, पण महाराष्ट्रातील आरोग्य सेवेत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा, बेड्सची व्यवस्था आयसीयू बेड यांची व्यवस्था करण्यासंदर्भातील अधिकार सर्वच जिल्हाधिकाऱ्यांना तथा महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. आणखी क्षमता वाढवण्याचे काम राज्यात सुरू आहे. सध्या जे नियम तयार करण्यात आलेले आहेत, ते लागू आहेत. सरकार व सरकारमधील सर्व मंत्री एकत्रितपणे परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतील. अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, असे मलिक यांनी म्हटले आहे.

राज्यावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट ओढवले असून, अभुतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेचा संक्रमण वेग प्रचंड असल्याने अवघ्या महिनाभरातच आरोग्य व्यवस्थेवर ताण येणे सुरू झाले आहे. राज्यात ठिकठिकाणी बेड, ऑक्सिजन, आयसीयू बेड, औषधींचा तुटवडा जाणवत आहे. आगामी काळात परिस्थिती आणखी बिकट होणार असल्याची भीती व्यक्त केली जात असून, राज्य सरकार लॉकडाऊनच्या तयारीत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवार दि. 11 एप्रिल रोजी तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश असलेल्या कृती दलाच्या सदस्यांशी चर्चा केली असून, राज्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दोन आठवड्यांचा लॉकडाऊन करावा, असे मत तज्ज्ञांनी या बैठकीत मांडले आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub