कोरोनाविरोधातील लस परभणी जिल्ह्यात दाखल!

कोरोनाविरोधातील लस परभणी जिल्ह्यात दाखल!

परभणी (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण राज्य हे कोरोना महामारीशी झूंज देत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वच देशातील वैज्ञानिक लस तयार करण्याचे महत्त्वाचे काम करत असून, डिसेंबर पासून देशाच्या कानाकोपऱ्यात कोरोना लस पोहोचण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, कोरोनाव्हायरविरुद्धची जगातील सर्वात मोठी मोहीम भारतीय भूमीवर 16 जानेवारीपासून सुरु होणार असून, परभणी जिल्ह्याला बुधवार दि. 13 जानेवारी रोजी सायंकाळी 6.30च्या सुमारास कोरोनावरील लसीचे 9 हजार 330 डोस मिळाले आहेत.

कोरोनाच्या संसर्गामुळे मागील आठ महिने जिल्हावासीय धास्तावलेले होते. कोरोनाच्या संसर्गावर कोणतीही लस नसल्याने केवळ प्रतिबंधात्मक उपाय करणे एवढेच नागरिकांच्या हाती होते. त्यातच तीन-चार महिन्यांपासून कोरोनाची लस येणार, या बातम्या नागरिकांना दिलासा देत असल्या तरी प्रत्यक्षात लस कधी येणार, याची खरी प्रतीक्षा होती. ती आता संपली असून, जिल्ह्यासाठी कोविशिल्डच्या 933 वायल (बॉटल) प्राप्त झाले आहेत. एका वायलमध्ये 0.5 एम.एल.चे 10 डोस तयार होतात. याप्रमाणे 9 हजार 330 डोस जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्यासह आरोग्य विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही लस उतरवून घेण्यात आली.

देशासह परभणी जिल्ह्यात 16 जानेवारी रोजी पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. त्यासाठी येथील आरोग्य विभागाने तयारी केली आहे. आरोग्य विभागातील औषध निर्माण अधिकारी मंगला खिस्ते या बुधवारी सकाळीच लस आणण्यासाठी औरंगाबादकडे रवाना झाल्या होत्या. सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या कंपनीच्या कोविशिल्ड या लसीचे 9 हजार 330 डोस घेऊन त्या परभणीत दाखल झाल्या. येथील जायकवाडी परिसरातील शीतगृहात ही लस उतरविण्यात आली असून, यावेळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्यासह जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शंकरराव देशमुख, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सुरवसे यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील शासकीय आणि खाजगी आरोग्य विभागात काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना सर्वप्रथम ही लस दिली जाणार आहे. आरोग्य विभागातील 8 हजार 517 अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शासनाच्या कोविन ऍपवर लस घेण्यासाठी नोंदणी केली आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर्सना लस दिली जाणार असून, त्यासाठी 2 हजार 414 जणांची नोंदणी झाली आहे. शासनाच्या सूचनेप्रमाणे जिल्ह्यात तीन केंद्रांवर ही मोहीम राबविली जाणार आहे. जिल्हा रुग्णालय, महानगरपालिकेचे जायकवाडी येथील रुग्णालय आणि सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात हे लसीकरण होणार असून, प्रत्येक केंद्रावर 100 लाभार्थी याप्रमाणे 300 जणांना या दिवशी लसीकरण केले जाणार आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub