भाजीपाला खरेदीसाठी बिटामध्ये विक्रेत्यांची गर्दी!

भाजीपाला खरेदीसाठी बिटामध्ये विक्रेत्यांची गर्दी!

परभणी (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण राज्यावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट ओढवले असून, अभुतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात परिस्थिती आणखी बिकट होणार असल्याची भीती व्यक्त केली जात असून, राज्यात 30 एप्रिल पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, परभणी जिल्हा प्रशासनाने कोरोणाची साखळी तोडण्यासाठी अनेक अत्यावश्यक सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला असून, त्याची अंमलबजावणी शनिवार दि. 17 एप्रिल पासून होणार आहे. त्यामुळे, शुक्रवार दि. 16 एप्रिल रोजी पाथरी रस्त्यावरील बाजार समितीच्या बिटामध्ये किरकोळ विक्रेत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. त्याचबरोबर शहरात देखील सर्वदूर असेच चित्र दिसून आले.

राज्य शासनाने लागू केलेले सर्व निर्बंध जिल्हा प्रशासनाने जसेच्या तसे लागू केले होते. परंतु या निर्बंधांचा शहरासह जिल्ह्यात काहीही परिणाम होत नव्हता. तर दुसरीकडे कोरोना संसर्ग दिवसेंदिवस अधिकच फैलावत असल्याचे चित्र होते . तसेच सार्वजनिक ठिकाणी, बाजारपेठेतील गर्दी देखील कमी होत नसल्याने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी शनिवार दि. 17 एप्रिल पासून अनेक शासकीय, निमशासकीय कार्यालयासह अत्यावश्यक सेवांमध्ये मोडणाऱ्या खाद्यपदार्थ विषयक आस्थापना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्ह्यात शनिवारपासून भाजीपाला, किराणा दुकाने अशा अनेक अत्यावश्यक सेवा पुढील सात दिवस बंद राहणार असल्याने गुरुवार दि. 15 एप्रिल रोजी खरेदी साठी बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी उसळली. तीच गर्दी शुक्रवारी सुध्दा पाहण्यास मिळाली. एकीकडे संसर्ग वाढत असताना दुसरीकडे अनेक विक्रेते, व्यापारी व नागरिकांना सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे भान राहिलेले नाही. त्यामुळे, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी निर्बंधांची अंमलबजावणी करण्याचे दायित्व पोलीस प्रशासनासह महानगरपालिका, नगरपालिका, तालुका प्रशासन यांच्याकडे सोपवलेली आहे.

दरम्यान, राज्य शासनाकडून करण्यात आलेल्या संचारबंदीच्या आदेशाची शहरासह जिल्ह्यातील नागरिक, काही व्यापारी, विक्रेते खुलेआम निर्बंधाची पायमल्ली करीत असल्याचे चित्र होते. गेल्या काही दिवसांपासून निर्बंध मोडणाऱ्यांवर जिल्ह्यात कुठलीही कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे रस्त्यावरील, बाजारपेठेतील गर्दी काही कमी झाली नाही व कोरोना संसर्ग मात्र झपाट्याने वाढू लागला आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस प्रशासनावर या निर्बंधाची कठोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असून, त्यांना नागरीकांची साथ मिळाल्यास कोरोना साखळी तोडण्यास नक्कीच मदत होणार आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub