राज्यात तिसरी लाट येऊ द्यायची नाही : मुख्यमंत्री ठाकरे

राज्यात तिसरी लाट येऊ द्यायची नाही : मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई (प्रतिनिधी) : सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली असून, रुग्णालयातील रिक्त खाटांची संख्या वाढली आहे. त्यामुळे राज्यात लागू करण्यात आलेले निर्बंध हटविण्यासाठी राज्य सरकारने अनलॉकचे आदेश जारी केले आहेत. असे असले तरी मात्र, संकट टळलेले नसून, कोरोनाची तिसरी लाट देखील येणार असल्याचे तज्ञांचे मत आहे. यापर्श्वभूमिवर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी आशासेविका तसेच अंगणावाडी सेविकांना हाक दिली आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याची भीती असून यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत आशा सेविकांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी आशासेविकांना त्यांच्या मागण्या लवकरच पूर्ण होतील असे आश्वासन देत त्यांच्या कार्याबद्दल मानाचा मुजराही केला. ठाकरे म्हणाले की, अजूनही कोरोना संकट गेलेले नाही. संकट टळलेले नसले तरी ते नियंत्रणात आणू शकतो असे चित्र निर्माण झाले आहे. राज्यात जे काम आपण करत आहोत त्याची आश्चर्यकारकरित्या देशात आणि परदेशात प्रशंसा होत आहे.

कौतुक होत असताना महाराष्ट्र आणि मुख्यमंत्री यांचे कौतुक होते. पण मी काहीच केलेले नाही मी फक्त निमित्तमात्र असून, कर्ते करवते तुम्ही आहात, असे सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आशा शब्दाला साजेसे काम आपण करत आहात असे कौतुक केले. दरम्यान, सरकार येण्याआधी आशा आणि अंगणवाडी सेविकांना काढलेल्या मोर्चाची आठवण करुन देत उद्धव ठाकरेंनी यावेळी मदतीचे आश्वासन देत म्हणाले की, सरकारच्या कारकिर्दीची सुरुवात केल्यानंतर बळीराजाकडे आधी लक्ष दिले. तुमच्या आशा, अपेक्षांकडे लक्ष देणार तितक्यात कोविड संकट आले. पण तुम्हाला विसरलो आहोत असे समजू नका. आपले ऋण विसणार नाही. परतफेड करणं शक्य नसलं तरी तुमच्या वेदनांची दखल घेतली आहे. त्यावर मी नक्कीच मार्ग काढणार असून त्यासाठी थोडा अवधी लागेल. सरकारला थोडी मुभा द्या, अशी विनंती उद्धव ठाकरेंनी यावेळी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, दुसरी लाट आल्यानंतर तिसऱ्या लाटेचा धोका लहान मुलांना आहे. तिथे तुमचे काम अधिक आहे. आतापर्यंतही तुम्ही खूप काम केले आहे. घरोघरी जाऊन पाहणी, तपासणी केली आहे. तुम्ही सर्वांनी महाराष्ट्राला कुटुंब म्हणून तळाहाताच्या फोडासारखे जपले आहे. तेच हात तिसरी लाट थोपवताना हवी आहे. दुसरी लाट ओळखायला उशीर केला आणि संकट आले. आताही आपण निर्बंध उठवत असून त्याच्यासाठी काही निकष ठरले होते. मात्र तुमच्यावरील ओझे कमी झालेले नाही. आता पावसाळ्यात कोविड आणि नॉन कोविड ओळखणे कठीण झाले आहे. त्यामुळे आव्हाने सामोरे जावून न डगमडता कोरोना संकट थोपवायचे आहे. तिसरी लाट येऊ द्यायची नाही, असा निर्धार उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub