फडणवीसांनी केंद्राकडून महाराष्ट्राला मदत मिळवून द्यावी : संजय राऊत

फडणवीसांनी केंद्राकडून महाराष्ट्राला मदत मिळवून द्यावी : संजय राऊत

मुंबई (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण राज्य हे कोरोना महामारीशी झूंज देत असून, कोरोनाच्या संक्रमणावर मात करण्यासाठी लसीकरणाला देखील सुरुवात झालेली आहे. असे असले तरी मात्र, पुन्हा एकदा राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात बेड्स, ऑक्सिजन यांची कमतरता जाणवत असून, कोरोना लसींचा तुटवडा आहे. अशा परिस्थितीत विरोधकांनी राजकीय फाटे फोडता कामा नये. विशेषत: देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मदत मिळवून देण्यासाठी सहकार्य केले पाहिजे. शेवटी तेही महाराष्ट्राचे नेते आहेत, असे आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

राज्यातील कोरोना स्थिती, लसींचा तुटवडा, बेड्स आणि ऑक्सिनजची कमतरता यांवर संजय राऊत यांनी भाष्य केले. ते पत्रकारांशी बोलत होते. पुढच्या काही काळासाठी राजकीय अडचणीचे प्रश्न बाजूला ठेवले पाहिजे. कोरोनाच्या स्थितीत सत्ताधारी आणि विरोधकांनी हातात हात घालून काम केले पाहिजे. सगळ्यांनीच कोरोनाविरुद्धच्या युद्धात उतरले पाहिजे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस महोत्सवाची घोषणा केली. लोकांनी लसीकरणात सहभाग घ्यावा म्हणून त्यांनी आवाहन केले. मात्र, महाराष्ट्रात सध्याच्या घडीला लसींची तुटवडा आहे. यावरून कोणताही वाद न घालता केंद्र सरकारने महाराष्ट्राला लस कशी देता येईल, याचा विचार करावा, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्याला लसींचा थेट पुरवठा करणे हा राजकारणाचा भाग आहे. त्यामुळे केंद्र सरकारचीच नाचक्की होईल. केंद्राच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होईल. राज्य सरकारचे ऐकले जात नाही, असा संदेश जाईल, असे संजय राऊत यांनी सांगितले. दरम्यान, देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण असतानाही लसीच्या पुरवठ्याबाबत दुजाभाव का कशासाठी? राज्यात केवळ साडेसात लाख लसीचे डोस पुरवण्यात आले. पण इतर राज्यांना 40 लाखांहून अधिक डोस देण्यात आले आहेत. यात राजकारणाचा मुद्दा नाही. पण ज्या पद्धतीने पुरवठा केला जात आहे ते योग्य नाही. दर आठवड्याला आम्हाला 40 लाख डोसेस द्या त्यापेक्षा अधिक आमची काहीच मागणी नाही, असे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub