लॉकडाउनच्या नियमांचे पालन करा : जेठालाल

लॉकडाउनच्या नियमांचे पालन करा : जेठालाल

मुंबई (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण देशावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट ओढवले असून, अभुतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात परिस्थिती आणखी बिकट होणार असल्याची भीती व्यक्त केली जात असून, ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये जेठालाल हे पात्र साकारणारे दिलीप जोशी यांनी सरकारला दोष देण्यापेक्षा लॉकडाउनच्या नियमांचे पालन करा, असे आवाहन लोकांना केले आहे.

देशभरात कोरोना संसर्गाचा जोर अजूनही कायम असून, दररोज साडेतीन ते चार लाख रुग्णांची भर पडत आहे. रुग्णसंख्येच्या विस्फोटामुळे आरोग्य सुविधा कोलमडताना दिसत असून, वेळेत उपचार न मिळाल्याने, त्याचबरोबर ऑक्सिजन वा इतर सुविधांअभावी रुग्णांचे प्राण जात आहे. त्यामुळे अनेकजण सरकारवर निशाणा साधत आहेत. या पार्श्वभूमिवर, दिलीप जोशी यांनी सरकारला दोष देण्यापेक्षा लॉकडाउनच्या नियमांचे, सोशल डिस्टंसिंगचे पालन आणि जेथे जास्त लोक जमा होतील तेथे जाऊ नका असे आवाहन केले आहे. तसेच सर्वांनी मास्क लावणे गरजेचे आहे, कामा शिवाय घराबाहेर पडून नका असे देखील त्यांनी म्हटले आहे.

दिलीप जोशी म्हणाले की, लॉकडाउन संपल्यानंतर आज आपण जशी काळजी घेत आहोत तशीच घेत रहायला हवी. लोकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये किंवा काही झालेच नाही असे वागू नये. पुढे ते म्हणाले की, केवळ सरकारला दोष देण्याऐवजी लोकांनी जबाबदारीने वागायला हवे आणि सहकार्य केले पाहिजे. आपण सर्व सावध राहिलो नाही, सुचनांचे पालन केले नाही तर ही साथ कधीही संपणार नाही. आपण सर्वांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे आवश्यक आहे, मास्क लावावे आणि लवकरात लवकर लस घ्यायला हवी, असे आवाहन जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी यांनी लोकांना केले आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub