जिल्ह्यातील चार लाख कुटुंबांना मिळणार मोफत धान्य!

जिल्ह्यातील चार लाख कुटुंबांना मिळणार मोफत धान्य!

परभणी (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण राज्यावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट ओढवले असून, अभुतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात परिस्थिती आणखी बिकट होणार असल्याची भीती व्यक्त केली जात असून, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण राज्यात 15 दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदी काळात राज्यातील आर्थिक दुर्बल घटकांना त्रास होणार नाही यासाठी चांगले आर्थिक सहाय्य तसेच अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य योजनेतून प्रति व्यक्ती 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ याप्रमाणे एक महिना मोफत धान्य देण्यात येणार आहे. याचा लाभ जिल्ह्यातील 4 लाख 14 हजार 698 रेशनकार्डधारकांना होणार आहे.

राज्य शासनाने मंगळवार दि. 13 एप्रिल रोजी घोषित केलेल्या मोफत धान्य वितरण निर्णयाचा लाभ जिल्ह्यातील 4 लाख 14 हजार 698 लाभार्थ्यांना होणार असून, यामध्ये बीपीएल कुटुंबातील 70 हजार 923 तर अंत्योदय योजनेतील 44 हजार 953 आणि केशरी रेशन कार्ड असलेल्या 2 लाख 94 हजार 76 रेशन कार्डधारक लाभार्थ्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कुटुंबीयांना 5 किलो मोफत धान्य देण्याची मंगळवारी घोषणा केल्यानंतर त्याची तातडीने प्रशासनाकडून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. दरम्यान, हाताला काम नसल्याने घरीच बसून असलेल्यांना हा निर्णय स्वागतार्ह आहे.

मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या निर्णयानुसार पात्र रेशन कार्डधारकांना प्रत्येकी 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही, अशा व्यक्तींनाही या योजनेचा लाभ शासनाच्यावतीने देण्यात येणार आहे. तसे मुख्यमंत्र्यांनी घोषित केले आहे. दरम्यान, अनेक गरजू कुटुंबीय या योजनेसाठी पात्र असतानाही त्यांच्याकडे रेशन कार्ड नाही. त्यामुळे या योजनेचा ते लाभ घेऊ शकत नाहीत, अशा लाभार्थ्यांसाठी पुरवठा विभागाकडे नवे रेशन कार्ड प्राप्त झाले आहे. त्यांनी संबंधित तहसील कार्यालयाकडे कार्डसाठी अर्ज केल्यास त्यांना सदरील कार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहेत.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub