देशात नव्या कोरोना बाधितांनी ओलांडली शंभरी!

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण देश हे कोरोना महामारीशी झूंज देत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वच देशातील वैज्ञानिक लस तयार करण्याचे महत्त्वाचे काम करत असून, डिसेंबर पासून देशाच्या कानाकोपऱ्यात कोरोना लस पोहोचण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, जगभरात कोरोनाच्या नव्या प्रकाराने पुन्हा एकदा खळबळ उडाली असताना भारतातही या नव्या स्ट्रेनची संख्या 109 वर पोहोचली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवार दि. 14 जानेवारी रोजी दिली असून, सर्व राज्यांना खबरदारीचा इशारा देखील देण्यात आला आहे.
देशाच्या कानाकोपऱ्यात कोरोना लस पोहोचण्याची तयारी सुरु झाली असून, त्यासाठी संपूर्ण देश एकजूट होऊन काम करत आहे. कोरोना लसीकरणाच्या मोहीमेला सुरुवात होण्याच्या आधी ‘कोविशील्ड’ लसीची पहिली बॅच मंगळवारी 13 शहरांमध्ये पाठवण्यात आलेली आहे. दरम्यान, ब्रिटनमधून आलेल्या नव्या कोरोनाच्या विषाणूने काळजात भर टाकली आहे. भारतात या नव्या विषाणूच्या संक्रमितांची संख्या आता शंभरी पार गेली असून, नुकताच मुंबईतील तीन रुग्णांमध्ये अशा प्रकारचा विषाणू आढळून आला आहे, ज्यावर अँटिबॉडीजचाही परिणाम होत नसल्याचे एका रिपोर्टमधून समोर आले आहे.
ब्रिटन, दक्षिण आफ्रिकेपाठोपाठ आता जपानमध्येही नुकतेच कोरोना विषाणूचा नवीन प्रकार (स्ट्रेन) आढळून आला आहे. ब्राझीलमधून जपानमध्ये परतलेल्या चार जणांमध्ये हा कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आला आहे. कोरोनाचा हा नवीन स्ट्रेन आतापर्यंत जगामध्ये कुठेच आढळून आलेला नाही. तज्ज्ञांनी या स्ट्रेनसंदर्भात सतर्कतेचा इशारा दिला असून हा नवीन प्रकारचा विषाणू ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या स्ट्रेनप्रमाणेच अधिक जास्त संसर्गजन्य असल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. या नवीन स्ट्रेनचा खुलासा झाल्याने जगभरामध्ये पुन्हा खळबळ माजली आहे.
जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.