भारतीय पोलीस जगातील सर्वोत्कृष्ट : अजित पवार

भारतीय पोलीस जगातील सर्वोत्कृष्ट : अजित पवार

मुंबई (प्रतिनिधी) : जीवघेण्या कोरोना वायरसपुढे संपुर्ण देश हतबल झाले असून कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ते सर्व उपाय योजना केल्या जात आहेत. दरम्यान, देशात आज बुधवार दि. 21 ऑक्टोबर रोजी ‘पोलीस स्मृती दिन’ साजरा केला जात आहे. भारतीय पोलीस जगातील सर्वोत्कृष्ट पोलीस असून त्यांच्या देशभक्ती, कर्तव्यनिष्ठेचा आम्हाला अभिमान आहे अशा शब्दांत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन ‘पोलीस स्मृती दिना’ निमित्त शहीद पोलीस वीरांना अभिवादन केले आहे.

देशात 21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाख येथे चीनच्या सैनिकासोबत लढतांना केंद्रीय राखीव दलाच्या दहा जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. तेव्हापासून 21 ऑक्टोबर हा पोलिस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो. वर्षभरात जे जवान देशात आणि राज्यात शहीद झाले अशा जवानांना या 21 ऑक्टोबर रोजी श्रद्धांजली वाहण्यात येते.  दरम्यान, कोरोनासारख्या अदृश्य शत्रूशी पोलीस गेले आठ महिने जीवाची जोखीम पत्करुन अहोरात्र लढत आहेत. पाकिस्तान, चीनसारख्या शत्रूसैन्याशी लढण्यापासून मुंबईवरील दहशतवादी हल्ला नेस्तनाबूत करण्यापर्यंत अनेक आघाड्यांवर भारतीय पोलिसांनी अतुलनीय शौर्य गाजवले असल्याचे प्रतिपादन अजित पवार यांनी केले आहे.

देशांतर्गत कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या भारतीय पोलिसांनी, प्रसंगी देशाच्या सीमांच्या रक्षणासाठी सरहद्दीवर युद्ध लढले आहे. सीमेवर शत्रूशी लढताना, दहशतवादाचा, नक्षलवादाचा बिमोड करताना अनेक पोलिसांनी हौतात्म्य पत्करले आहे. नागरिकांच्या जीवाची, मालमत्तेच्या रक्षणाची जबाबदारी असलेले पोलीस अनेक आघाड्यांवर लढत असतात. देशात नागरिकांना सुरक्षित व विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करणारे पोलिसच असतात. पोलीस हे आपल्या सुरक्षेच्या बरोबरीने राष्ट्रनिर्माणाचेही काम करीत असतात. पोलीस दलातील आजी-माजी अधिकारी, जवान व त्यांच्या कुटुंबियांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *