राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना!

राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना!

मुंबई (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण देशावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट ओढवले असून, अभुतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात परिस्थिती आणखी बिकट होणार असल्याची भीती व्यक्त केली जात असून, राज्यात ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याची आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांना दिलेल्या असून, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील याबाबत विधान केले आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता केंद्राने वर्तवलेली आहेच. ती जुलै शेवट, ऑगस्ट, सप्टेंबर या दरम्यान राहील अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्याची पूर्व तयारी राज्य शासनाच्यावतीने केली जात आहे. यामध्ये प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना आहेत की, आपण बेड वाढवण्याकडे लक्ष द्या, केवळ बेडची संख्या वाढवून चालणार नाही. त्याला लागणारे मनुष्यबळ, कुशल मनुष्यबळ, डॉक्टर्स, औषधी, ऑक्सिजन या सगळ्यासंदर्भात स्वतः आपण स्वयंपूर्ण झालो पाहिजेत. यासाठी आपण पीएसए दर्जाचे ऑक्सिजन प्लॅन्ट लावले पाहिजे, असे टोपे यांनी सांगितले.

राजेश टोपे पुढे म्हणाले की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची पूर्व तयारीत ऑक्सिजन जनरेटर आपण मोठ्या पद्धतीने विकत घेतले पाहिजेत. आपण जे काही ग्लोबल एक्स्प्रेशन ऑफ इंट्रेस्ट काढले होते, त्या संदर्भातील देखील जे काही प्रस्ताव विविध देशातून आलेले आहेत, त्याबाबत अंति निर्णय त्वरीत घेतला पाहिजे असे आदेश आरोग्यमंत्री म्हणून मी दिलेले आहेत. तसेच, लिक्विड ऑक्सिजन साठवण्यासाठी जे ऑक्सिजन टँक्स आहेत, ते जे काही ऑफर झालेल्या आहेत त्याच्या पीओ लवकर दिल्या गेल्या पाहिजेत. ऑक्सिजन कॉन्सनट्रेटरच्याबाबत आमचे जे काही टास्क फोर्स आहे, त्यांनी लवकर त्यांना अप्रुव्हल दिले पाहिजे, असे देखील यावेळी टोपे यांनी बोलून दाखवले.

दरम्यान, राज्यात कोरोनाची तिसरी लाट जुलै-ऑगस्ट महिन्यात येणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. त्यापूर्वी आपण प्राणवायूच्या बाबतीत स्वंयपूर्ण झाले पाहिजे. प्रत्येक तालुक्यात प्राणवायूचा प्रकल्प तयार पाहिजे. प्राणवायूसाठी आज जी धावपळ सुरु आहे, ती तेव्हा होता कामा नाही. तिसऱ्या लाटेच्यावेळी प्राणवायू नाही, अशी सबब कोणालाही सांगता येणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यावी, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरूवार दि. 06 मे रोजी राज्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub