महाराष्ट्र आणि कर्नाटकात चालणाऱ्या आयपीएल सट्ट्याचे रॅकेट उघडकीस

महाराष्ट्र आणि कर्नाटकात चालणाऱ्या आयपीएल सट्ट्याचे रॅकेट उघडकीस

सोलापूर (प्रतिनिधी) : कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने यंदाच्या आयपीएलचे आयोजन युएईत केले. आयपीएलचा घमासान सुरू झाल्यापासून क्रिकेट प्रेमींना एकामागून एक थरारक सामने देखील पाहायला मिळाले. दरम्यान, आयपीएलचा 13वा हंगामा अंतिम टप्प्यात आला असून, महाराष्ट्र आणि कर्नाटकात चालणाऱ्या आयपीएल सट्ट्याचे रॅकेट सोलापूरच्या गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. मोबाईलद्वारे हा सगळा सट्टा सुरु होता, अशी माहिती पोलीस उपायुक्त बापू बांगार यांनी दिली.

सोलापूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 6 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सोलापुरातील अवंतीनगर भाग 2 येथील पर्ल हाईटसच्या एका फ्लॅटमध्ये छापा टाकला. यावेळी आरोपी चेतन रामचंद्र वन्नाल आणि विग्नेश नागनाथ गाजूल हे दोघेही आयपीएलच्या मॅचेसवर सट्टा घेत असल्याचे आढळून आले. आयपीएलचा सामना सुरु असताना टीव्हीवर चालू क्रिकेट मॅच पाहत, टॉस कोण जिंकेल, 6, 10, 15 आणि 20 ओव्हर्समध्ये कोणता संघ किती धावा काढेल, शेवटी सामना कोणती टीम जिंकेल यावर मोबाईलद्वारे दररोज सट्टा लावणाऱ्या इसमांकडून फोनवर सट्टा घेऊन त्याचा हिशोब लिहीत असताना आढळून आले.

पोलिसांनी एकूण 4 आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 38 लाख 44 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कर्नाटकातील कलबुर्गी (गुलबर्गा) येथील बसवेश्वर नगर परिसरातील एका घरावर छापा टाकला. या ठिकाणी सोलापुरात राहणारे दोघे आरोपी सट्टा चालवत असल्याचे उघडकीस आले. या आरोपींकडून 3 लॅपटॉप, 1 टॅब, 13 मोबाईल हॅंडसेट, 1 माईक, 1 हॉटलाईन सेट, मोडेम, टीव्ही, डीव्हीआर असा अंदाजे 3 लाख 33 हजार 200 रुपयांचे साहित्य तसेच गुन्ह्यात वापरलेली अंदाजे 30 लाख रुपये किमतीचे वाहने, सट्टा खेळण्यासाठी लागणारे काही रोख रक्कम असे एकूण 38 लाख 44 हजार 200 रुपयांचे मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.

सर्वसामान्य माणसाला जास्तीचे पैसे देण्याचे आमिष दाखवून हा सगळा सट्टा सुरु होता. सोलापूरच्या गुन्हे शाखेने कमालीची गुप्तता पाळत महाराष्ट्र आणि कर्नाटकात चालणारा हा सट्टा रॅकेट उद्वस्त केला. आरोपींविरोधात महाराष्ट्र जुगार कायदा कलम 4, 5 सह 420, 109, 269, 336, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2005 चे कलम 66 डी सह आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, या आरोपींना न्यायलयात हजर केले असता न्यायलायने त्यांना पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिली.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub