माझे बाद होणे दुर्देवी, पण त्या बद्दल मला खंत नाही : रोहित

माझे बाद होणे दुर्देवी, पण त्या बद्दल मला खंत नाही : रोहित

ऑस्ट्रेलिया : सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका सूरू असून, 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ 1-1 अश्या बरोबरीत आहेत. दरम्यान, गाबा येथे ब्रिस्बेनच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये चौथा कसोटी सामना सुरु आहे. मालिकेतील हा अखेरचा आणि निर्णायक कसोटी सामना आहे. मालिका जिंकण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया दोघांना या कसोटीत विजय आवश्यक आहे. मात्र, चौथ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात रोहित शर्मा नॅथन लायनच्या चेंडूंवर ज्या पद्धतीने बाद झाला, त्यावरुन त्याच्यावर भरपूर टीका होत आहे.

भारतीय संघाची सद्य स्थिती लक्षात घेता, उपकर्णधार रोहित शर्माची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. कारण अश्विन, जडेजा, बुमराह आणि विहारी हे प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. नियमित कर्णधार विराट कोहली सुद्धा भारतामध्ये आहे. त्यामुळे रोहितकडून संघाला भरपूर अपेक्षा आहेत. पण चौथ्या सामन्यातील पहिल्या डावात रोहित शर्मा ज्या पद्धतीने बाद झाला, त्यावरुन त्याच्यावर भरपूर टीका होत आहे. संघाला गरज असताना, रोहितला असा बेजबाबदार फटका खेळण्याची गरज नव्हती, असे क्रिकेट पंडितांपासून ते सर्वसामन्य प्रेक्षक म्हणत आहेत.

रोहितवर चहूबाजूंनी टीका होत असताना या विषयावर तो म्हणाला की, नॅथन लायनच्या गोलंदाजीवर मी जो फटका खेळलो, त्याबद्दल मला अजिबात खंत नाहीय. रोहित पुढे म्हणाला की, मला चेंडू जिथे पोहोचवायचा होता, तिथे पोहोचवू शकलो नाही. लाँग ऑन आणि डीप स्क्वेअर-लेगच्या फिल्डरच्या मधून मला चेंडू मारायचा होता. मला ज्या पद्धतीने हा फटका खेळायला आवडतो, तसे बॅट आणि चेंडूचे कनेक्शन झाले नाही. आज जे मी केले, ते मला आवडले. इथे येण्याआधी फलंदाजीसाठी चांगली खेळपट्टी आहे, हे माहित होते.

रोहित पुढे म्हणाला की, मैदानावर जाऊन काही षटके खेळल्यानंतर चेंडू स्विंग होत नसल्याचे माझ्या लक्षात आले. माझे बाद होणे दुर्देवी आहे. पण त्या बद्दल मला खंत नाही. मैदानावर गेल्यानंतर गोलंदाजांवर दबाव टाकायला मला आवडते. गोलंदाजांवर दबाव टाकणे, ही माझी या संघातील भूमिका, असे रोहित शर्माने पत्रकार परिषदेत म्हटले आहे. दरम्यान, दुसऱ्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात पावसानेच बॅटिंग केली. त्यामुळे पंच आणि सामनाधिकाऱ्याने खेळ थांबवला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 369 धावा केल्या असून, भारतीय संघ दोन बाद 62 धावांवर खेळत आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub